Breaking News

रोहा-मुरूडमधील फार्मा पार्कच्या स्वागतासाठी सुनील तटकरे आतुर

रासायनिक प्रकल्पांवरून दुटप्पी भूमिका ; भाजपचे महेश मोहिते यांचा गंभीर आरोप

अलिबाग : प्रतिनिधी
कोकणात एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे खासदार सुनील तटकरे रायगडात प्रस्तावित फार्मा पार्क प्रकल्पाला लवकर मान्यता द्या, असे पत्र केंद्रीय रसायनमंत्र्यांना का लिहितात, असा सवाल भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 17) येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तटकरे यांनी केंद्रीय रसायनमंत्र्यांना लिहिलेले पत्रच मोहिते यांनी या वेळी सादर करीत तटकरेंची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला.
राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात मुरूड आणि रोहा तालुक्यामध्ये फार्मा पार्क प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. प्रकल्पाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुरूड तालुक्यातील 10, तर रोहा तालुक्यातील सात अशा एकूण 17 गावांतील तीन हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी सध्या शेतकर्‍यांना 32/2 अंतर्गत भूसंपादनाच्या नोटीस बजाविण्यात आल्या आहेत, मात्र प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.
जवळपास सहा हजार शेतकर्‍यांनी प्रकल्प नको अशी भूमिका मांडली आहे. प्रकल्पाविरोधात आंदोलने आणि निदर्शने केली आहेत. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदनेही दिली आहेत, मात्र शेतकर्‍यांनी निवेदन दिल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे प्रकल्पाला मंजुरी द्या, अशी मागणी केली. ही मुरूड आणि रोह्यातील जनतेची फसवणूक आहे, असे अ‍ॅड. मोहिते म्हणाले.
आता प्रकल्पासाठी गुरुवारी 18 फेब्रुवारीला जनसुनावणी होणार आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता भूसंपादन आणि प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ही जनसुनावणी होऊ देणार नाही. जनभावना लक्षात घेऊन राज्य सरकारने भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी; अन्यथा जनतेच्या रोषाला समोरे जावे लागेल, असा इशारा अ‍ॅड. मोहिते यांनी दिला.
एकीकडे रायगड जिल्ह्यात यापूर्वी एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या जागा वापराविना पडून आहेत, तर दुसरीकडे नवीन जागा प्रकल्पांसाठी संपादित केल्या जात आहेत. आधी पडून असलेल्या जागांवर प्रकल्प उभारा. मग नव्याने जागा संपादित करा, अशी मागणी अ‍ॅड. मोहिते यांनी केली. या वेळी प्रकल्पबाधित शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply