Breaking News

महाडकरांवर अन्याय! वेळ पडल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार

माजी आमदार माणिक जगताप यांचा इशारा

महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील विविध प्रकल्प, कार्यालये इतरत्र नेली जात असल्याने नागरिकांनी वेळीच जागे झाले पाहिजे, असे भावनिक आवाहन करतानाच वेळ आलीच तर राज्य सरकारच्या विरोधात महाडकर नागरिक म्हणून रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप यांनी मंगळवारी (दि. 16) पत्रकार परिषदेतून दिला.
माणिक जगताप म्हणाले की, महाड गेल्या काही वर्षांपासून विकास व प्रगतीपासून लांब आहे. महाडमध्ये सन 2005मध्ये आपत्ती आली तरीदेखील या आपत्तीचा तमाम नागरिकांनी धैर्याने सामना केला. 2005मध्येच महाडमध्ये विविध प्रकल्प आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, मात्र त्यानंतर महाडमध्ये मोठे प्रकल्प आले नाहीच. याउलट आणलेले प्रकल्प पळवून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांच्यावर केला. महाडमधील सिंचन प्रकल्प रखडले आहेत. येथे होणारी शिवसृष्टी पाचाडमध्ये नेण्यात आली आणि तेथूनदेखील हळूच रोह्यात नेली जाईल. महाडमधील विविध कार्यालये, प्रकल्प इतरत्र नेले जात आहेत, मात्र स्थानिक आमदार गप्प बसून असल्याने राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून याबाबत जाब विचारला जाईल.
महाड ही एकेकाळची मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण आजही उद्योग-व्यापारात अग्रेसर आहे, पण आजार गुडघ्याला आणि उपचार डोक्याला अशी स्थिती निर्माण झाली असल्याची टीका करीत जगताप म्हणाले की, महाडसह कोकणात नवीन औद्योगिक क्षेत्र आणि क्लस्टरच्या घोषणा होत असताना कामगार न्यायालय मात्र दक्षिण रायगडमधून उत्तर रायगडमध्ये नेले जात आहे. अलिबाग हे आता मुंबईशी जोडले जात असल्याने वैद्यकीय महाविद्यालयदेखील दक्षिण रायगडमध्ये असणे गरजेचे आहे, मात्र आता तेही अलिबाग येथे होत आहे. महाड विकासापासून लांब जात असल्याने राज्यात सरकार कोणतेही असो येथील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने भविष्यात आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली तरी ती घेऊ. या वेळी जगताप यांनी ज्या योजना, प्रकल्प आम्ही महाडमध्ये आणले त्या येथून नेण्यापेक्षा नवीन काही तरी आणून दाखवा, असा टोला खासदार सुनील तटकरे यांना लगावत येथील प्रकल्प आणि कार्यालये इतरत्र जात असताना स्थानिक आमदार झोपलेत का, असा सवालदेखील केला.  

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply