खोपोली : प्रतिनिधी
खोपोलीजवळील ढेकू-साजगाव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत बुधवारी (दि. 17) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज घडून आग लागली. यात केमिकल युक्त ड्रमसहित 50 मीटर उंचीवर आगडोंब उसळत होता. कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन व्यवस्थापनाकडून तातडीने उपाययोजना केल्याने ही आग नियंत्रणात आली व संभाव्य दुर्घटना टळली, मात्र कंपनीतील एका उत्पादन विभागाचे मोठे नुकसान झालेय.प्रसोल कंपनीतील या स्फोटाच्या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, कंपनीतील एका उत्पादन विभागात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्टॅटिक चार्ज निर्माण होऊन हा स्फोट झाल्याचे समजते. कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व कर्मचार्यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी तातडीने उचित उपाययोजना झाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणीही जखमी नसून, सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर खोपोली पोलीस प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पहाणी केली असून, पुढील सविस्तर माहिती घेतली जात आहे.