अलिबाग : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना सोमवारी (दि. 10) रात्री अटक करण्यात आली. प्रशांत मिसाळ यांना मंगळवारी (दि. 11) मुरूड येथील प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अन्वय नाईक यांनी कोर्लई येथील सुमारे आठ एकर जागेत 19 बंगले बांधले होते. कोर्लई येथील जमीन ठाकरे व वायकर कुटूंबियांनी खरेदी केली होती. त्यानंतर ठाकरे व वायकर कुटूंबियांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन घेतली होती. रश्मी ठाकरे यांनीदेखील गेली अनेक वर्षे या जागेची घरपट्टी भरली असल्याचे समोर आले आहे, परंतु तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या कालावधीत या जमिनीच्या खरेदीचा उल्लेख निवडणूक घोषणापत्रात केला नाही. त्यामुळे या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.
त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक देवंगना वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, माजी सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकरी व प्रशांत मिसाळ यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. यानंतर उद्धव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला होता. अखेर सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने प्रशांत मिसाळ यांना अटक केली.
Check Also
पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …