Breaking News

गुजरात काँग्रेसला धक्का; अल्पेश ठाकोर यांची सोडचिठ्ठी

अहमदाबाद : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश ठाकोरचे जवळचे सहकारी धवलसिंह झाला यांनी ही माहिती

प्रसारमाध्यमांना दिली.

ठाकोर सेना समितीने एक ठराव मंजूर केला असून त्यांनी मला, अल्पेश आणि भरतजी ठाकोर आम्हा तिघांना काँग्रेस सोडण्यास सांगितले आहे. हे तिघेही काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ठाकोर समाजाच्या मागण्यांकडे पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाकोर सेना समितीने हा ठराव मंजूर केला आहे. सध्या तरी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही, असे धवलसिंह झाला यांनी सांगितले.

महिन्याभरापूर्वी अल्पेश ठाकोरने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्या वेळी अल्पेश ठाकोर यांनी पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची कबुली दिली होती. मी माझ्या लोकांसाठी लढत राहणार. मी काँग्रेसमध्येच राहून काँग्रेसला पाठिंबा देणार. सत्ता प्रत्येकाला आवडते. मी सुद्धा मंत्रिपदाबाबत गंभीर आहे. मंत्रिपद मिळाल्यास मलासुद्धा अडचणींचा सामना करणार्‍या माझ्या लोकांची सेवा करता येईल, असे अल्पेश ठाकोर यांनी त्या वेळी म्हटले होते.

गुजरात काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे. त्यावर आपण नाराज आहोत, अशी कबुली ठाकोर यांनी महिन्याभरापूर्वी दिली होती. मी पक्षाध्यक्षांच्या कानावर सुद्धा ही बाब घातली आहे. तरुण नेत्यांना पक्षात योग्य संधी मिळाली पाहिजे. तुम्ही मलाच सर्व काही द्या असे मी म्हटलेले नाही. मला पक्षाकडून योग्य तो मानसन्मान मिळाला आहे. ठाकोर समाजासाठी मी अनेक मागण्या केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अल्पेश ठाकोरला दिल्लीत स्थान मिळणार, पण समर्थकांचे प्रश्न सुटणार नसतील, तर काय उपयोग आहे, असा सवाल त्यांनी केला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply