Breaking News

गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी रायगड पोलीस सज्ज

महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग : प्रतिनिधी

गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा, यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले  आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. याशिवाय या  महामार्गावर 13 ठिकाणी सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर रायगडच्या हद्दीत गणेश भक्तांच्या मदतीसाठी 13 ठिकाणी मदत केंद्रांची स्थापना केली जाणार आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथून लाखो चाकरमानी दरवर्षी कोकणात येतात. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. गणेशभक्त वाहतूक कोंडीत अडकू नयेत म्हणून रायगड  पोलिसांनी यंदा विशेष उपाययोजना केल्या आहे.

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमनासाठी आठ उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक 21 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 274 पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. त्यांच्या मदतीला 100 स्वयंसेवक  असणार आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सुचनाही त्यांना दिल्या जाणार आहेत.

महामार्गावर गणेश भक्तांच्या मदतीसाठी 13 ठिकाणी मदत केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. या ठिकाणी रुग्णवाहिका आणि क्रेन्स ठेवण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांची पथकेही सज्ज ठेवली जाणार आहे. महामार्गावर वाहने बंद पडल्यास ती तातडीने हलविण्यासाठी या मदत केंद्रांवर यंत्रणा तयार ठेवली जाणार आहे. प्रत्येक मदत केंद्रावर एक पोलीस अधिकारी  उपस्थित असणार आहे.

रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीतील पेण, वडखळ, गणेश चौक पाली, वाकण फाटा, कोलाड नाका, इंदापूर, माणगाव शहरात तीन ठिकाणी, लोणेरे, राजेवाडी फाटा, पोलादपूर या 13 ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.  पोलीस अधिक्षक कार्यालयातून या सर्व ठिकाणांवरील वाहतुकीच्या परिस्थितीवर थेट नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक कोंडी उद्भवल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयातून थेट कर्मचार्‍यांना सूचना देण्यात येणार आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply