नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई शहरात रुग्णाच्या संपर्कातील फक्त 15 जणांचा शोध घेतला जात होता. मात्र आता एका कोरोना बाधिताच्या संपर्कातील 24 जणांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनीही टाळेबंदी टाळण्यासाठी कोरोना नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. पालिका प्रशासनाने आता कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन केले आहे. एका कोरोना बाधिताच्या संपर्कातील 24 जणांचा शोध घेण्यात येणार आहे.
शहरात कोरोनाचे दैनंदिन रुग्ण जानेवारीमध्ये 50 पेक्षा खाली आले होते. 1 फेब्रुवारीपासून सर्वासाठी लोकल सुरू झाली आणि दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत गेली. आता दैनंदिन रुग्णांची संख्या 150 पर्यंत गेली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांत वाढ होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही दीड हजाराच्या घरात जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने जास्ती जास्त संशयितांच्या चाचण्या करण्याचे नियोजन केले आहे.
डिसेंबर व जानेवारीमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 15 व्यक्तींची शोध घेत पालिका त्यांची तपासणी करीत होती. आता रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींची तत्काळ कोरोना चाचणी तर लांबच्या संपर्कातील व्यक्तींचे गृह अलगीकरण करण्यात येणार आहे. यासाठी एका रुग्णामागे 24 संपर्कातील रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
गृह अलगीकरणातील संशयित घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या वाढली तरी चालेल, परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेने मोठी पावले उचलली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या 55 हजारांच्या पुढे, तर मृतांची संख्याही 1100च्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक पुन्हा विनामास्क फिरताना दिसत असून हे स्वत:बरोबरच सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच पालिकेने पुन्हा कडक नियमावली करून कारवाईला सुरुवात केली आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कातील कमीत कमी 20 तर जास्तीत जास्त 24 जणांचा शोध घेण्यात येत आहे. जवळील संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांनी पालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
250 डॉक्टरांच्या नियुक्तीचे नियोजन
रुग्ण वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने आरोग्य सुविधांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील डॉक्टर व परिचारिका व इतर पदांची नेमणूक केली होती. रुग्ण कमी झाल्याने त्यांना कमी करण्यात आले होते. आता पुन्हा आरोग्यकर्मीची गरज भासणार असून आवश्यकतेनुसार प्रतीक्षा यादीत असलेल्यापैकी 250 जणांची नियुक्ती करण्याचे नियोजन असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.