Breaking News

भारताकडून बांगलादेशचा धुव्वा

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज

रायपूर : वृत्तसंस्था
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये शुक्रवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने बांगलादेश लिजंड्सवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अनेक वर्षांनंतर सचिन तेंडलुकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी पुन्हा मैदानात पाहायला मिळाली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण बांगलादेशला पूर्ण 20 षटकेही खेळता आल्या नाहीत. बांगलादेशचा डाव 19.4 षटकांत 109 धावांवर आटोपला. भारताकडून नमन ओझा, युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर गोनी आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताचे सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात आले. सेहवागने त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्ये सुरुवात केली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार लगावला. सेहवाग-सचिन जोडीने 110 धावांचे लक्ष्य 10.1 षटकात सहज पार केले.
सेहवागने 35 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या, तर सचिनने 26 चेंडूंंत नाबाद 33 धावा केल्या. सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळताना अवघ्या 20 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतरही त्याने बांगलादेशी गोलंदाजांना मोकळीक दिली नाही व 35 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 80 धावा करीत भारताला विजय मिळवून दिला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply