लसीसंदर्भातील भ्रम होणार दूर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
केंद्राच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांबरोबरच पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीला 16 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीसंदर्भात लोकांत असणारा भ्रम दूर करण्यासाठी दुसर्या टप्प्यात सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदारांबरोबरच इतर आजार असणार्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते 80 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. 80हून अधिक वय असणार्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एचडी देवेगौडा यांच्याबरोबरच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे. सरकारने कोरोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.
सध्याची आकडेवारी पाहता लोकसभेतील 300हून अधिक नेते 50 पेक्षा जास्त वयाचे आहेत, तर राज्यसभेमधील 200हून अधिक खासदार वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत. पहिल्या टप्प्यात भारत सरकार तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी व पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचे वृत्त आहे.