ऑनलाइन निवडणूक उपक्रमाचा ‘डायट‘कडून गौरव
माणगाव : प्रतिनिधी
पनवेल येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी घेतलेल्या यशोगाथा या शैक्षणिक उपक्रमात भाले (ता. माणगाव) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष बापट यांनी सादर केलेल्या ’इव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रिमंडळ ऑनलाइन इलेक्शन’ या उपक्रमाचे विशेष कौतुक झाले.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने (डायट) मागील दोन वर्षात ’एक महिना एक उपक्रम’, ’मैत्री भूगोलाशी’, नवोपक्रम स्पर्धा, यशोगाथा असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले होते. त्यात जिल्ह्यातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यशोगाथा या उपक्रमात संतोष बापट यांनी सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त सहकार्याने ’इव्हीएम मशीनद्वारे शालेय मंत्रिमंडळ ऑनलाइन इलेक्शन’ ऑनलाइन सादर केले होते.
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांतून शालेय मंत्रिमंडळ निवडले जाते. निवडणूक प्रक्रियेत वापरले जाणारे इव्हीएम मशीन, उमेदवारी अर्ज दाखल करणे, ते मागे घेणे, चिन्ह वाटप, निवडणूक प्रचार, आचारसंहिता, मतदान, मतमोजणी, निकाल घोषित करणे यासारखे शब्द संतोष बापट यांनी सादर केलेल्या उपक्रमातून मुलांना प्रात्यक्षिकाद्वारे अनुभवता आले. या उपक्रमाचे मूल्यांकन करून जिल्हा स्तरावर चतुर्थ क्रमांकाने गौरवण्यात आले.
या स्पर्धात्मक उपक्रमांचा पारितोषीक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात घेण्यात आला. त्यात विजेत्या शिक्षकांना, शाळांना सन्मानचिन्ह, प्रशिस्तीपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. या वेळी डायटने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली. संस्थेच्या प्राचार्य चंद्रकला ठोके, डायटचे सर्व अधिव्याख्याते, कर्जतचे गटशिक्षणाधिकारी दौंड आणि उपक्रमात सहभागी झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक या वेळी उपस्थित होते. सर्वांनी कौतुक केले.