आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; गरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी
खोपोली : प्रतिनिधी
नगरपंचायत खालापूर निवडणूकिसाठी भारतीय जनता पक्ष खालापूरची आढावा बैठक शनिवारी (दि. 6) झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी 24 जानेवारीला पूर्ण झाला आहे, परंतु कोरोना संसर्गामुळे निवडणूकीची तारिख जाहीर होण्यास विलंब होत आहे. प्रभागानुसार आरक्षण सोडत तीन महिन्यांपूर्वीच जाहीर झाली असून राजकिय पक्ष तयारीलादेखील लागले आहेत. खालापूर नगरपंचायतीचे 17 प्रभाग आहेत. पाच वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने 17 पैकी 10जागा जिंकून सत्ता मिळवली होती. पाच जागा मिळालेली शिवसेना विरोधी बाकावर होती. दोन जागांसह राष्ट्रवादीने शेकापची सोबत केली होती. अद्याप युती आणि आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवरून निर्णय न झाल्याने प्रमुख पक्ष शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत आहेत. खालापूर येथे बैठकीत उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे समोर भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे 17 प्रभागात भाजप उमेदवार उभे करणार आहे.
या आढावा बैठकीसाठी रायगड जिल्हा महिलाध्यक्षा अश्विनी पाटील, भाजप ज्येष्ठ नेते राजेंद्र येरूणकर, विनोद साबळे, रामदास ठोंबरे, खालापूर शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, रेखा गणेशकर, प्रसाद पाटील, दीपक जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.