अलिबाग ः प्रतिनिधी
टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पशुधनाची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पशुपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा यासाठी सुविधा दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्थाही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यात सुमारे एक हजार 300 पशुपालकांना दूध, मटण, अंडी, जनावरांचे खाद्य, वैरण आदी वाहतुकीसाठी सुविधी देण्यात आल्या आहेत. काही दूध उत्पादक पशुपालकांकडे शिल्लक दूध राहिल्याने पशुसंवर्धन विभागातील अधिकार्यांच्या मदतीने या दुधाची लोणावळा, पनवेल, खारघर येथे विक्री करण्यात आली. भटके कुत्रे, गाय, बैल व वासरे आदी प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. माथेरान या पर्यटनस्थळी जवळपास 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून या घोड्यांसाठी डॉ. जयराम यांच्या मदतीने प्राथमिक स्वरूपात 15 एप्रिल रोजी 300 किलो गोदरेज कंपनीचे पौष्टिक अश्वखाद्य वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, प्राणी क्लेश समिती सदस्य, प्राणीमित्र या व्यक्तींचीही मदत घेण्यात येत आहे. कंत्राटी कुक्कुटपालन व्यावसायिकांनीही वस्तू स्वरूपात मागणीनुसार मदत करण्यास संमती दर्शविली. तसेच सीमा शांतीलाल पुनमिया यांनी पंख फाऊंडेशनच्या वतीने मुक्या प्राण्यांची भूक शमवण्यासाठी फूड बँकेची स्थापना केली आहे.