खोपोली : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असलेल्या टाटा स्टील बीएसएल प्लांटने टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या 182 व्या जयंती वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आयोजित करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
भारतात उद्योजकतेचा पाया ज्यांनी रचला असे महान, द्रष्टे उद्योगपती जमशेदजी नसरवानजी टाटा यांना खोपोलीच्या टाटा स्टील बीएसएलचे एक्झिक्युटिव्ह प्लांट हेड कपिल मोदी यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत पुष्पांजली अर्पण केली. काही इतर स्थानिक कारखान्यांमधील अधिकार्यांनीदेखील या वेळी जे. एन टाटा यांना आदरांजली वाहिली.
टाटा समूहाचे संस्थापक जे. एन. टाटा यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटने वृक्षारोपण अभियान सुरु केले आहे. पिंपळ, अर्जुन, फणस, करंज, बेहडा, गुलमोहर, बहुनिया, अल्स्टोनिया, मोहोगनी अशी तब्बल 04 हजार रोपे पुढील 30 दिवसांमध्ये प्लांटच्या परिसरात लावण्यात येणार आहेत. यानिमित्ताने इतरही अनेक उपक्रम करण्यात आले असून कंपनीच्या टाऊनशिपमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक केंद्राचे आणि प्लांटच्या आत कर्मचार्यांसाठी नवीन डायनिंग हॉलचे उद्घाटन खोपोली युनिटच्या एक्झिक्युटिव्ह प्लांट हेड यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या वर्षी संस्थापकांचा जयंती दिन साजरा करण्यासाठी शाश्वत भविष्यासाठी सक्रिय वर्तमान ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. परंतु कोविड-19 पासून सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली आहे.