नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी दिवसानिमित्ताने देशातील सात हजार 500व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सहभाग नोंदवला. या वेळी त्यांनी काही लाभार्थ्यांशी संवादही साधला. भारतात कोरोना लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस केवळ भारतीयांसाठी नाही, तर ती जगासाठीही असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी बोलताना केले.
पैसे नाही, म्हणून कोणीही औषधांपासून वंचित राहू नये, यासाठी जनऔषधी केंद्रांची सुरुवात करण्यात आली. जनऔषधी दिवसाच्या निमित्ताने देशाला सात हजार 500 वे जनऔषधी केंद्र समर्पित करताना आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली होती.
कोरोना संकटाशी लढण्यासाठी संपूर्ण जगभरात लसीसाठी शास्त्रज्ञ काम करत होते. भारतात लस निर्मिती झाल्याने आपण जगासाठी औषधाचे केंद्र बनले आहोत. मेड इन इंडिया कोरोना लस केवळ भारतीयांसाठी नाही, तर ती जगासाठीही आहे. जागतिक स्तरावर सर्वांत स्वस्त कोरोना लस भारतातून पुरवली जात आहे. खासगी रुग्णालयात कोरोना लसीची किंमत केवळ 250 रुपये आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
संपूर्ण देश मला माझ्या परिवारासारखा आहे. तुम्ही आजारी असाल, तर माझे कुटुंबीय आजारी आहे, असे मला वाटते. म्हणून आरोग्य आणि औषधांच्या अधिकाधिक उत्तमोत्तम सोयी, सुविधा आपल्याला देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. जनऔषधी केंद्रांमधून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मदत मिळत आहे. जनऔषधी केंद्रांमुळे सामान्य कुटुंबांची प्रतिवर्ष 50 हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.