मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. याआधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात उद्रेक झाला होता. यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. या निर्णयाविरोधात राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून शुक्रवारी नवी तारीख जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 21 मार्चला होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करून 14 मार्च रोजी नियोजित परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, 27 मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020, तसेच 11 एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी?
मुंबई ः एमपीएससी परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलू नये, अशी विनंती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी ही यांनी मागणी फेटाळत निर्णय घेतल्याने दोन्ही काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, कॅबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार, प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विनंती केली होती की, परीक्षा पुढे ढकलू नये. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर काहींनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन उघडपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व नेत्यांच्या विनंतीस केराची टोपली दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच बड्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेस सीएम ठाकरे फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे आणि यावरूनच नाराजी अधिक वाढल्याची माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली. आधीच महाविकास आघाडी सरकारमध्ये असमन्वय आहे. एमपीएससी परीक्षेवरून तो आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.