Breaking News

विराट आणि रोहितला सौरवचं रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी

30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं 20 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

प्रत्येक चार वर्षांनंतर होणार्‍या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळाडू अनेक विक्रमांना गवसणी घालतात. 2015 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये दोन द्विशतकं झळकवण्यात आली. वर्ल्ड कपमध्ये द्विशतकं करण्याची ती पहिलीच वेळ होती. भारताकडून मात्र आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला वर्ल्ड कपमध्ये द्विशतक करता आलं नाही. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सौरव गांगुलीने एका इनिंगमध्ये सर्वाधिक स्कोअर केला आहे. 1999 सालच्या वर्ल्ड कपमध्ये गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध 183 रनची खेळी केली होती. गांगुलीच्या आधी 1983 सालच्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध ऐतिहासिक 175 रन केले होते. वर्ल्ड कपमध्ये बराच काळ कपिल देव यांचं हे रेकॉर्ड टिकून होतं. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टन यांनी हे रेकॉर्ड मोडलं.

सौरव गांगुलीचं रेकॉर्ड मोडण्याची संधी सेहवाग आणि सचिनलाही होती. 2011 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध ढाक्यात सेहवागने 175 रनची खेळी केली. तर 2003 सालच्या वर्ल्ड कपमध्ये सचिनने नामिबियाविरुद्ध 152 रन केले होते. वनडेमध्ये पहिलं द्विशतक करणार्‍या सचिनचा हा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

रोहित शर्मानं आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये रेकॉर्ड 7 वेळा 150 पेक्षा जास्त रन केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर 3 द्विशतकं आहेत. रोहितचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअर 264 रन आहे. वनडेमध्ये सर्वाधिक स्कोअर आणि सर्वाधिक द्विशतकाचा विक्रम सध्या रोहितच्या नावावर आहे.

रोहितच्या नावावर हा विश्वविक्रम असला, तरी वर्ल्ड कपमध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 137 रन आहे. 2015 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशविरुद्ध रोहितने मेलबर्नमध्ये ही खेळी केली होती.

विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये दोन शतकांचा समावेश आहे. पाकिस्तानविरुद्ध 2015 वर्ल्ड कपमध्ये विराटने 107 रनची खेळी केली होती. हा विराटचा वर्ल्ड कपमधला सर्वाधिक स्कोअर आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये 4 वेळा 150 पेक्षा जास्त रन केल्या आहेत. विराटचा वनडेमधला सर्वाधिक स्कोअर 183 रन आहे.

– वर्ल्ड कपमधली द्विशतकं वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आणि वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने द्विशतकं केली आहेत. ही दोन्ही द्विशतकं 2015 वर्ल्ड कपमध्ये झाली आहेत. गप्टीलने वेस्ट इंडिजविरुद्ध वेलिंग्टनमध्ये नाबाद 237 रनची खेळी केली होती, तर गेलने झिम्बाब्वेविरुद्ध कॅनबेरामध्ये 215 रन केले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply