शर्मिला टागोरने शैलीदार फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मन्सूर अली खान पतौडीची विकेट कशी काढली आणि त्याच्याशी लग्न करून त्याची बेगम कशी झाली या विषयी एका रसिक पिढीला काय भारी उत्सुकता होती हो…
सिलसिला पिक्चरमध्ये दिग्दर्शक यश चोप्रा अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील जवळीकीत जया बच्चन यांची होत असलेली घालमेल म्हणा, चिडचिड म्हणा दाखवत आहेत असे या चित्रपटाचे स्वित्झर्लंडमध्ये चित्रीकरण सुरू व्हायच्या आतच खमंग रुचकर चर्चा…
आपलं निस्सीम प्रेम व्यक्त करण्यासाठी सलमान खान अख्खी रात्र ऐश्वर्या रॉयच्या प्रशस्त इमारतीबाहेर होता ही गोष्टही गाजली…
चित्रपटाच्या जगातील गॉसिप्स एक महत्त्वाचा फंडा. राज कपूर आणि नर्गिस यांच्यापासून गॉसिप्सच्या रंगात अनेक जोड्या गाजल्या. विवाहित पुरुष आणि अविवाहित अभिनेत्री यांच्या खरोखरच्या अथवा खोट्या नात्याविषयीचे समाजातील जवळपास सर्वच स्तरातून असलेलं कुतूहल कायमच सुपर डुपर हिट. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या हळूहळू विणल्या गेलेल्या नातेसंबंधावर वेबसिरीज बनेल. त्या काळात यांच्या जवळकीवर गॉसिप्स मॅगझिनमधून इतकं आणि असं काही रंगवून खूलवून वाढवून शिजवून सांगितलं गेलं की त्यातून धर्मेंद्रचाच भडका उडाला. अशा गरमागरम स्टोरीजची जणू शोध पत्रकारिता करण्यात माहिर असलेल्या देवयानी चौबळ आणि त्या जोडीला कृष्णा यांच्या दिशेने एकदा धर्मेंद्र धावून गेल्याची गोष्ट एका मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावरची बातमी ठरली. बंगालच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत निघालेली कलाकारांची मदत फेरी महालक्ष्मी येथील टर्फ क्लबवर संपत असतानाच हा ड्रामा घडला. या क्षणी लालबुंद झालेल्या धर्मेंद्रने एक प्रकारे हेमा मालिनी यांच्याशी असलेल्या नात्याची अप्रत्यक्षपणे कबुलीच दिल्याचे मानले जाते.
गॉसिप्स मॅगझिनमधून विनोद खन्ना आणि अमृता सिंग यांच्यापासून संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यातील कळत नकळत बंध निर्माण झालेला असो (त्यात तो विवाहित, मात्र सुभाष घई सांगत, यांच्यात तसं काही नाही.) अशा अनेक सेलिब्रिटींच्या जवळीक असो, मग दुरावा असो, विनोद मेहरा आणि बिंदीया गोस्वामी यांचा घटस्फोट असो, आशा सचदेव म्हणा शीतल म्हणा अथवा पद्मिनी कपिला, के.टी. मिर्झा, कोमिला विर्क, किम, किमी काटकर, प्रेमा नारायण अशा अनेक अभिनेत्रींची ( त्यांना त्या काळात पिन अप गर्ल म्हणत) धाडसी फोटो सेशन, बेधडक मुलाखती हे सगळे त्या गॉसिप्स मॅगझिनचा खुराक असे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात या नावाच्या अभिनेत्री होत्या हे आजच्या ग्लोबल युगातील जेन झी पिढीला कदाचित माहित नसावे आणि ते माहित असूनही काही उपयोग नाही इतक्या आणि अशा सहजतेने आज इन्स्टाग्रामवर आजच्या पिढीतील अनेक मॉडेल्स बिकीनी गर्ल म्हणून दर्शन घडवताहेत.
साधारण तीस वर्षांपूर्वी रंगीला गर्ल साकारताना उर्मिला मातोंडकरने तनहा तनहा यहा पे जीना यह कोई गाण्यात पडदाभरचे प्रसंगानुरूपचे ग्लॅमरस दर्शन पाहून काहींनी लगेचच टीकेचा सूर लावला. आजही तुम्ही यू ट्यूबवर हे धक धक गाणे पहा, ते कुठेही अश्लील वाटत नाही, अतिशय देखणे आणि आकर्षक असेच दिसते. तशी नजर हवी, दृष्टिकोन हवा. तो नसेल तर उलटसुलट चर्चा होत राहते.
आज वेबसिरीजमध्ये मॉडर्न वस्त्रातील अभिनेत्री, बेदिग सूट अथवा बिकीनी बेबीज, मोकळेढाकळे प्रणय दृश्य याचे काही आश्चर्य वाटत नाही. तशी दृश्ये देण्यासाठीची व्यावसायिकता आणि मानसिक ताकद आजच्या पिढीतील कलाकारांमध्ये आहे. साऊथचे चित्रपट भडक असतात असे म्हटले जाते. तेथील तेलुगू अथवा तमिळ चित्रपटात थीमची आणि प्रसंगानुरूप धाडसी प्रेम दृश्ये आपल्या महाराष्ट्रीयन अभिनेत्रीही देतात. गुगलवर सर्च केल्यावर साऊथच्या चित्रपटातील श्रृती मराठे असे बघा. सकारात्मक उत्तर मिळेल आणि त्यासाठी तिला दादच द्यायला हवी.
असं काही पूर्वी असते तर त्यावरुन गॉसिप्स शिजले असते. कधी काळी विश्वजीतने अंजाना सफर या चित्रपटाच्या सेटवर रेखाचे चुंबन घेतले यावरील चर्चेचा फार फार किस पाडला गेला. आज धाडसी कथानकावरील चित्रपटात तो सहज येतो जातो. सई ताम्हणकरचे हंटर (2015) या चित्रपटातील प्रणय दृश्य फार गाजले. तसं दृश्य देण्यासाठी लागणारी हिंमत तिच्यात दिसली हे महत्त्वाचं. मग अशा दृश्याच्या चित्रीकरणात चलाखी किती, कॅमेरा ट्रीक कशी हे वेगळे समीकरण आहे. आता व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून त्यात काय काय दाखवता येईल हे पडद्यावर पहावे.
गॉसिप्स मॅगझिनचा सर्वात मोठा खुराक सेलिब्रिटीचे लग्न, मग त्यांच्या संसारातील धुसफूस. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे अगदी अनपेक्षित लग्न झाले आणि ती मराठी वृत्तपत्रातातील पहिल्या पानावरची बातमी झाली आणि दोन मुली झाल्यावर त्यांच्या पालनपोषणात हे दाम्पत्य रमले असतानाच त्यांच्यात वाद विवाद निर्माण झालेत अशा अनेक गोष्टी वांद्रे येथील कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्याबाहेर पडू लागल्या. यावर गॉसिप्स मॅगझिनमधून काय काय आले काही विचारू नका. जणू जगात अन्य कोणाच्या संसारात काही भांडणेच होत नाहीत, पण त्यांना ग्लॅमर नाही हा मोठाच वांदा आहे.
आजच्या मनोरंजन क्षेत्रातील सुज्ञ सेलिब्रिटी अतिशय थाटामाटात लग्न करतात, सोशल मीडियात भरभरून कव्हरेज मिळवतात. एखाद्या सेलिब्रिटीच्या साखरपुड्याच्या कव्हरेजचे हक्क आपणास मिळावेत म्हणून काही डिजिटल चॅनेल चांगली किंमत द्यायला तयार असतात अशी कुजबुज आहे. लग्नाचे प्रक्षेपण विकणे आहे (साखरपुडा मोफत) या नावाचा चित्रपट निर्माण होऊ शकतो आणि म्हटले तर एक चांगला व्यवहार आहे. काही सेलिब्रिटी आपण लग्न करतोय अशी स्वतः पोस्ट शेअर करतात, तर काही सेलिब्रिटी त्याहीपेक्षा अधिक वेगाने आम्ही वेगळे होत आहोत अशी पोस्ट करतात. बरं अशी पोस्ट कोणाची आणि कधी वाचायला मिळेल हे अजिबात सांगता येत नाही अशी आज जणू प्रगती झाली आहे. अशा धक्कादायक (खरंच का?) बातम्या आतापर्यंत गॉसिप्स मॅगझिनमधून येत आणि तेथून त्या भाषिक माध्यमातून आल्या तरी त्यांना फार महत्त्वाचे स्थान नसे. विनोद खन्नाने दुसरें लग्न केले तेव्हा अनेकांना समजले की त्याने पहिल्या लग्नाचा घटस्फोट घेतला आहे. आपल्या घटस्फोटाचे अवाजवी प्रदर्शन केले जात नसे.
चित्रपटसृष्टीतील घटस्फोटाचीही आपली एक परंपरा आहे, काही दाम्पत्ये एकमेकांपासून वेगळी राहिली (म्हणूनच सुखात राहिली की काय? उदाहरणार्थ देव आनंद आणि कल्पना कार्तिक. देव आनंद भलेही रूपेरी पडद्यावरील मदन असेल अथवा प्रणयाचे प्रतिबिंब असेल, पण खासगी आयुष्यात पत्नीपासून वेगळा राहिला). आजच्या अनेक सेलिब्रिटीजना आपलं काम, आपली अभिनय शैली आणि क्षमता यापेक्षा आपल्या खासगी गोष्टींची आपणच प्रसार माध्यमातून भरभरून मुलाखती देत चर्चा व्हावी असे वाटते की काय? जे गॉसिप्स मॅगझिनमधून येत असे, ते आज खुद्द सेलिब्रिटीज सांगताहेत तर मग आपण कशाला, फिल्मी पार्टी कल्चर असो, सेलिब्रिटीजचे विवाहपूर्व व विवाहबाह्य संबंध असो, कोणाचे असलेच तर दुसरं लग्न असो, असेलच तर दुसरं तिसरं लफडे असो, आपण त्याच्या शोधात असण्यापेक्षा त्या गोष्टी कोणीही न विचारता समोर येत आहेत. त्यामुळे त्यातला जोर का धक्का धिरेसे लगे हा पंच गेला. आमिर खान जाहीरपणे बोलून आपलं दुसरं लग्न करतो हे सौम्य ठरले. त्यातील मानसिक, भावनिक गरजा ही महत्त्वाची गोष्ट.
फिल्मी गॉसिप्समध्ये असलेला आश्चर्याचा धक्काच हरवलाय. दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांचे प्रेमप्रकरण आश्चर्यकारक होते. तो विवाहित, तर ती अभिषेक बच्चनची पत्नी होणार अशी हवेतील बातमी, अशातच करिश्मा कपूर बच्चन खानदानाची सून होणार हे चक्क जाहीर झाले. पहिल्या रिळातच हा खेळ संपला. आणि ऐश्वर्या राय बच्चन खानदानाची सून झाली. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातही काही बिनसल्याची बराच काळ अशीच चर्चा होत राहिली. गॉसिप्सचा हा प्रवास अनेक वळणे घेत घेत चालला, यात रंजकता होती. अनपेक्षित धक्का होता. हे सगळे करण जोहरच्या चकाचक मल्टी स्टार कास्ट चित्रपटासाठी मसाला देणारे आहे.
आज मनोरंजन क्षेत्राचा फार फार विस्तार झाला आहे, रिल स्टार ही नवीन जमात आता काही सेकंदात इन्स्टाग्रामवर दिसते आणि गायब होते. वेब सिरीजमध्ये अनेक धाडसी दृश्ये असतात. यातून काही गॉसिप्स गंमत जन्माला येईल असे समजू. आपण आशावादी वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय आणि गॉसिप्स म्हणा, कुचाळक्या करणं म्हणा, कोणाला आवडत नाही? ते सर्वांनाच पचनी पडते. आजच्या मनोरंजन क्षेत्रातील मोकळ्या वातावरणातून जे जे बाहेर पडतेय ते धक्कादायक नसले तरी चर्चेसाठी खाद्य नक्कीच आहे… फिल्मी गॉसिप्सची चव गेल्यासारखे वाटतेय, ते अळणी वाटू लागले असले तरी फार उपासमार होणार नाही याची खात्री असू देत. कोणत्या अभिनेत्रीसाठी कोणता अभिनेता आपल्या लाडक्या बायकोला सोडचिठ्ठी द्यायला तयार होईल हे सांगता येत नाही हीच तर या गॉसिप्सची गंमत जंमत आहे… काय सांगावे? माझा पहिल्या नवरा आणि त्याची दुसरी बायको अथवा एका लग्नाचा अनुभव असलेली बायको अशा नावाच्या मालिका अथवा वेब सिरीज निर्माण होतील. मेरा पती सिर्फ मेरा है या नावाचा जितेंद्र आणि रेखाची भूमिका असलेला एक चित्रपट आला होता. माझ्या नवर्याची बायको या नावाची मालिकाही लोकप्रिय झाली. रसिका सुनील याच मालिकेने स्टार झाली.
एका नवीन युगातील मनोरंजन क्षेत्रात आपण आज कार्यरत आहोत, त्यात जणू लाईव्ह गॉसिप्स आहे. पूर्वी निदान एखादं गॉसिप वरवरचं असे, आता सबकुछ खुल्लम खुल्ला मामला है. त्यातूनच काही गॉसिप्स जन्माला येईलच की… सिनेमाचे जग आहे म्हटल्यावर अफेअर, लफडी, विवाहबाह्य आकर्षण, पार्टीतील फंडा, मोकळं ढाकळ वागणे, वावरणे असे बरेच काही असतेच, असायलाच हवे….
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper