Breaking News

पनवेल मनपाच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंगळवारी (दि. 16) शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. त्यानुसार विविध विभागांतील 650 नवीन पदांना मंजुरी मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेत एकूण 1042 पदे मंजूर झाली आहेत. 23 ग्रामपंचायतींमधील एकूण 288 कर्मचार्‍यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे.
पनवेल महापालिका ही ड वर्ग महापालिका आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या 10 लाख असून, तरंगती लोकसंख्या 13 लाख आहे. सद्यस्थितीत मालमत्ताधारकांची संख्या 3.5 लाख आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर यापूर्वी 33 संवर्गातील 42 पदांना मंजुरी देण्यात आली होती. आयुक्तांनी प्रमाणित केल्यानुसार आस्थापनेवर 393 पदे अस्तित्वात आहेत. पनवेलची वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण शासनाच्या आरोग्याशी निगडीत व विकासाच्या योजनांच्या अनुषंगाने वाढलेले काम विचारात घेऊन विविध संवर्गातील 650 वाढीव पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी व महसुली उत्पन्न लक्षात घेऊनच ही पदे भरणे अनिवार्य असेल. पनवेल महापालिका अंतर्गत प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, तांत्रिक व लेखा सेवेतील पदांवर बदलीने प्रतिनियुक्ती करता येणार नाही. ज्या सेवा बाह्य स्रोताद्वारे करणे शक्य आहे व अशा आवश्यक सेवा बाह्य स्रोताद्वारे पुरविण्यात याव्यात, जेणेकरून अशा पदांचा वेतन इत्यादीचा खर्च कायमस्वरुपी आर्थिक भार महापालिकेच्या आस्थापना खर्चावर होणार नाही.  पनवेल महापालिका स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन 23 ग्रामपंचायतींतीमधील एकूण 288 कर्मचार्‍यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply