Breaking News

उरण नाक्यावरील हातगाड्या जप्त

पनवेल महापालिकेची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातील उरण नाका परिसरात हातगाड्यांचा पसारा वाढत असल्याने व त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने येथील हातगाड्या जप्त केल्या आहेत.

पनवेल परिसरातील उरण नाक्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे. येथे कधीही जावे तर वाहतूक कोंडी जाणवतेच. ज्या दिवशी येथे वाहतूक कोंडी जाणवणार नाही त्या दिवशी वाहनचालकांना चुकल्यासारखे वाटेल इतकी वाहतूक कोंडीची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. रस्त्यावरील बाजारपेठ आणि पार्किंग ही येथील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर हातगाड्यांचा पसारा मोठ्या संख्येने वाढत आहे. हातगाडीवाले बिनधास्तपणे रस्त्यावर आपली हातगाडी लावत आहेत. टपाल नाका येथून उरण नाक्यापर्यंत फळे आणि भाज्या विक्री करणार्‍या हातगाड्या उभ्या असतात. या गाड्या पुढे उरण नाक्यावर गर्दी करतात. वाहतूक कोंडी वाढीचे हे मुख्य कारण आहे. हातगाड्यांवर महापालिका वारंवार कारवाई करीत असते, मात्र आणखी हातगाड्या येतात कुठून, असा सवाल उपस्थित होत आहे. वाहतूक पोलीसदेखील वारंवार हातगाड्या हटविण्यास सांगत असतात, तरीही हातगाडीचालक त्या ठिकाणावर ठाण मांडून असतात.

महापालिकेकडे वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने उरण नाका परिसरात हातगाड्या जप्त केल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

अतिक्रमण विभागाचे पथक दिसताच सिडकोहद्दीत पळ

पनवेलमधील उरण नाक्यावर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाचे पथक येताच हातगाडीवाले आपली हातगाडी घेऊन उरण नाका उड्डाणपुलाच्या पुढे म्हणजे सिडको हद्दीत वडघर, करंजाडे वसाहतीमध्ये पळ काढत असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्यावर महापालिका व सिडको विभागाने संयुक्तिक कारवाई केली तरच हातगाडीमुक्त पनवेल व वसाहत होईल असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

अतिक्रमण विभाग कर्मचार्‍याला फेरीवाल्याकडून दुखापत

पनवेल : वार्ताहर

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या पनवेल महापालिका अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍याला एका अनधिकृत फेरीवाल्याने धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तसेच एका कर्मचार्‍याच्या बोटाला चावा घेतल्याची घटना पनवेलच्या मार्केट यार्ड येथील परिसरात घडली.

रमेश गणेश काले (वय 32) असे या अनधिकृत फेरीवाल्याचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करुन दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पनवेल महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख संतोष पाटील (वय 36) आपल्या पथकासह पनवेलच्या प्रभाग समिती ‘ड’ विभागामध्ये फुटपाथ, रोड, दुकानाच्या बाहेर आणि वाहतुकीस अडथळा करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेले होते. या वेळी मार्केट यार्ड येथील रस्त्यावर आणि फुटपाथवर अनेक फेरीवाले महिला आणि पुरुष आपला माल विकण्यासाठी उभे असल्याचे तसेच त्यांच्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले.

त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या कर्मचार्‍यांना या अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचारी तेथील फेरीवाल्यांचा माल ताब्यात घेण्यासाठी गेले असताना, रमेश गणेश काले या फेरीवाल्याने निलेश गोवारी या कर्मचार्‍याला शिवीगाळ करून त्याला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतोष पाटील त्याच्याजवळ विचारपूस करण्यासाठी गेले असताना, रमेश काले याने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्या कानशिलात जोरात चापट मारली. या वेळी निलेश गोवारी याने त्याच्या फुलाची टोपली उचलली असता, त्याने गोवारी याच्या बोटाला चोरात चावा घेतला.

त्यामुळे गोवारी याच्या बोटातून रक्तस्राव होऊ लागल्याने त्याला तत्काळ उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकातील इतर कर्मचार्‍यांनी गोवारी याच्या बोटाला चावा घेणार्‍या रमेश काले याला पकडून पनवेल शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी रमेश काले याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्याला दुखापत केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply