माणगाव : प्रतिनिधी
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक कार्यक्रम, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. याचाच परिणाम येणार्या शिमगोत्सव होणार असून, त्यामुळे भाविक, चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. रायगड जिल्ह्यात विशेषत: दक्षिण रायगडमध्ये शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंपरा व चालीरीती यांच्याशी जोडलेल्या या उत्सवात लहानथोर आनंदाने सहभागी होतात. होळीपूर्वी नऊ दिवस आगोदर गावागावातून लहान होळ्या पेटविल्या जातात. यामध्ये लहान मुले, तरुण सहभागी होतात. यानिमित्ताने गावागावातील ग्रामदेवतेचे मंदिर, सार्वजनिक ठिकाणी नृत्य, खेळ, गाणी असे विविधांगी कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम सामाजिक ऐक्य, जनजागृतीचे भाग असतात. ढोलकी, झांज, घुंगरू याच्या माध्यमातून शिमगोत्सवात नाच, गाण्यांना बहार येतो. गावागावातून ग्रामदेवतेच्या पालख्यांचे आयोजन केले जाते. मुंबईकर चाकरमानी यानिमित्ताने हमखास गावी येत असतात. आचारविचार परंपरा यांचे पालन करून साजरा होणारा शिमगोत्सव होळी नंतरही चार ते पाच दिवस साजरा केला जातो. या वर्षी 28 मार्च रोजी होळी तर 29 मार्चला धुलीवंदन आहे. कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव, दिवाळी यांच्याप्रमाणेच शिमग्याच्या उत्सवावरही संकट आले आहे. यावर्षीचा शिमगोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घातले जातील, या शंकेने भाविक, चाकरमानी यांचा हिरमोड झाला आहे.
शिमगोत्सव निमित्ताने अनेक चाकरमानी, नोकरदार मंडळी हमखास गावाकडे जातात. परंपरा जपणारा हा सण वेगळा आनंद देतो. या निमित्ताने नृत्य, गाणी, खेळ यांची वेगळी मजा असते. या वर्षी कोरोनामुळे शिमगोत्सवावर निर्बंध आल्याने हा आनंद मिळणार नाही, याचे वाईट वाटत आहे.
-राजेश भावे. चाकरमानी, मुंबई
शिमगोत्सवाला कित्तेक पिढ्यांची परंपरा आहे. या निमित्ताने ग्रामदेवतांचा उत्सव सुमारे 15 दिवस आयोजित केला जातो. त्यात अनेक चालीरिती पाळल्या जातात. ग्रामदेवतेसमोर मनोरंजन, गाणी, खेळ, नृत्य यांचे सादरीकरण केले जाते. अनेक सामूहिक कार्यक्रम साजरे होतात. या वर्षी कोरोनामुळे या उत्सवावर मर्यादा येत आहेत, त्यामुळे उत्सवाचा आनंद मिळणार नाही.
-दत्ताराम यादव, ग्रामस्थ, माणगाव