कर्जत : बातमीदार
कर्जत-मुरबाड रोड आता राष्ट्रीय महामार्गमध्ये रूपांतरित झाला आहे. या रस्त्यावरील कळंब भागूचीवाडी येथील तीव्र चढाव हा वाहनचालकांसाठी परीक्षा पाहणारा होता. मात्र कर्जत-मुरबाड रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित झाल्याने तो तीव्र चढाव आता कमी होत असून त्या चढवाच्या बरोबर असलेले तीव्र वळणदेखील कमी होत आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा जोडरस्ता म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळकडून कर्जत-मुरबाड रस्ता विकसित केला जात आहे. कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीमधील तीव्र चढाव कधीच कमी होणार नाही, असे या रस्त्याने अनेक वर्षे प्रवास करणार्या वाहनचालकांना वाटत होते.कारण भागूचीवाडी येथील तो तीव्र चढाव आणि सोबत तीव्र वळण यांच्या बरोबर उभा असलेला डोंगर आणि एका बाजूला दरी असे चित्र आहे. 30 वर्षांपूर्वी या मार्गावर केवळ एसटी धावायची. त्या एसटीमधील प्रवाशांना खाली उतरूनच तीव्र चढावाचे अंतर पार करावे लागायचे. येथे तीव्र वळण असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात या ठिकाणी घडत होते. तर चढाव पार करताना अवजड वाहनांना आपल्या गाड्या बाजूला उभ्या करून ठेवाव्या लागत होत्या. मात्र या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करताना आता भागूचीवाडी येथील तीव्र चढाव कमी केला जात आहे. हा उतार कमी करण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात येत आहे. तर एका बाजूने डोंगर फोडून रस्ता रुंद केला जात आहे. त्यामुळे एकाच वेळी रस्त्याचा तीव्र चढाव कमी होईल आणि रस्ता रुंददेखील होणार आहे.