Breaking News

एनएमएमटीची विशेष तिकीट तपासणी मोहीम; फुकट्या प्रवाशांना दंड

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई परिवहन सेवेस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासीदेखील प्रवास करीत आहेत. त्यावर प्रतिबंध म्हणून मनपा परिवहन उपक्रमाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार दररोज किमान 200 ते 300 प्रवासी फुकट प्रवास करताना आढळत असून त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई केली जात आहे. साधारणतः मागील मार्च महिन्यापासून शहरात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता मनपा परिवहन सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती, पण  पाच महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर परिवहन उपक्रमानेदेखील आपल्या सर्व मार्गांवर बसेस सुरू केल्या आहेत. या वेळी वाढत्या गर्दीचा काही फुकटे प्रवासी फायदा उचलत आहेत. या फुकट्या प्रवाशांना जरब बसावी म्हणून परिवहन उपक्रमाने विशेष मोहीम सुरू केली आहे. आठवड्यातून दोन दिवस एनएमएमटी प्रशासनाचा ताफा महत्त्वाच्या व इतरही थांब्यांवर प्रवाशांची तपासणी करीत आहे. या वेळी दिवसाला शेकडो फुकटे प्रवासी आढळून येत आहेत. त्यांच्या दंडवसुलीतून परिवहन उपक्रमाला चांगला महसूल मिळत आहे. विशेष प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविल्यामुळे साहजिकच अप्रामाणिक वागणार्‍या प्रवाशांना भीती वाटून ते तिकीट काढून प्रवास करतील, असा आशावाद परिवहन अधिकारी व्यक्त करीत आहेत.

प्रवाशांनी फुकट प्रवास करू नये हाच ही मोहीम राबविण्यामागचा आमचा उद्देश आहे. आम्ही सातत्याने प्रवाशांची तिकीट तपासणी करीत असल्याने प्रवासी फुकट प्रवास करणार नाही अशी अपेक्षा आहे.

-उमाकांत जंगले, व्यवस्थापक, एनएमएमटी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply