रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत
पनवेल : वार्ताहर
पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2ने पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील ईमानूल मर्सिहोम आद्रमच्या बाजुला, नदीकाठी असलेले शेतघर येथे छापा घातला. या वेळी रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
या वेळी विविध उच्च प्रतीच्या बाटल्यांमध्ये भरणा करून बनावट विदेशी मद्य (स्कॉच) तयार केलेल्या मद्याच्या सुमारे 750 व 1000 मि. ली. क्षमतेच्या एकूण 110 बाटल्या तसेच बनावट मद्य तयार करण्याचे साहित्य व महिन्द्रा कंपनीची चारचाकी वाहन व एक ओपो कंपनीची मोबाइल असा एकंदर रुपये 13,24,860 रुपये किंमतीचा व रोख रक्कम 18,350 रुपये असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शिबिन दिनेश तिय्यार (वय 27, रा. घरकुल हौसिंग सोसायटी, खारघर) आणि सुशिलाल सुकुमार तिय्यार (वय 33 घरकुल हौसिंग सोसायटी, खारघर) यांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (ओ) (डी) (ई) (एफ) 81, 83, 86, 90 व 98 अन्वये पंचनाम्या खाली अटक करण्यात आले आहे. त्यातील फरार आरोपी प्रजीब प्रभाकरण के व जागा मालक यांस अद्याप अटक करणे बाकी आहे.
या गुन्ह्यातील जप्त केलेल्या बनावट विदेशी मद्याची (स्कॉच) कोणकोणत्या भागात विक्री केलेली आहे. याचा तपास चालु आहे. या गुन्ह्यामध्ये आंतराष्ट्रीय टोळी असल्याची दाट शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क रायगडचे अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शिवाजी गायकवाड हे करत आहेत.