पनवेल : रामप्रहर वृत्त
जेएनपीटी बंदराच्या विकास निधीतून दास्तान फाटा ते बेलपाडा गावातील हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत आहे याचा आम्हा लोकप्रतिनिधींना निश्चित अभिमान वाटत असून, बेलपाड्यासह विविध गावांच्या विकासासाठी या मतदारसंघाचा लोकसेवक म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार महेश बालदी यांनी केले. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असणार्या बेलपाडा गावाच्या रहदारीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जेएनपीटी बंदर प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली होती. या मागणीची दखल जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने घेऊन डांबरीकरणाच्या कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या विकासकामाचा शुभारंभ आमदार महेश बालदी व गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास जेएनपीटीचे माजी विश्वस्त रवी पाटील, पंकज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.