Breaking News

किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20मध्ये केले अनेक विक्रम

अहमदाबाद ः वृत्तसंस्था
भारतीय संघाने पाचव्या सामन्यात इंग्लंडवर विजय साकारून कसोटीपाठोपाठ टी-20 मालिकही जिंकली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत त्याने एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आहे.
या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडलाच, शिवाय आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेले पराक्रमही केले. विराटने आशियात 13 हजार धावांचा पल्ला याच सामन्यात पार केला. असा पराक्रम करणारा तो सहावा फलंदाज ठरला. या विक्रमात सचिन तेंडुलकर (21741), कुमार संगकारा (18423), माहेला जयवर्धने (17386), सनथ जयसूर्या (13757) आणि राहुल द्रविड (13497) हे आघाडीवर आहेत.
 आशियात 13,000 धावा करणारा विराट सहावा फलंदाज असला तरी त्याने हा पल्ला सर्वांत जलद गाठला. विराटने 260 डावांत हे शिखर सर केले. यासाठी सचिन तेंडुलकरला 277 डाव खेळावे लागले होते. कुमार संगकारा (294 डाव), माहेला जयवर्धने (316), राहुल द्रविड (327) व सनथ जयसूर्या (371) हे त्यामागोमाग येतात.
आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या कर्णधाराचा विक्रमही विराटने नावावर केला. त्याने 1463* धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरोन फिंच (1462), केन विलियम्सन (1383), इयॉन मॉर्गन (1321) यांना त्याने मागे टाकले.
आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20त कर्णधार म्हणून सर्वाधिक 12 अर्धशतकांचा विक्रमही विराटने नावावर केला. त्याने केन विलियम्सनचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. अ‍ॅरोन फिंच (10), इयॉन मॉर्गन (9) आणि फॅफ ड्यू प्लेसिस (8) यांचा क्रम त्यानंतर येतो.
द्विदेशीय ट्वेण्टी-20 मालिकेत 200+ धावा करणारा विराट कोहली हा पहिलाच कर्णधार ठरला. त्याने या मालिकेत 231 धावा केल्या आहेत. त्यानंतर अ‍ॅरोन फिंच (197 धावा वि. ऑस्ट्रेलिया, 2021) आणि इयॉन मॉर्गन (192 धावा वि. न्यूधीलंड, 2019) यांचा क्रमांक येतो.
आंतरराष्ट्रीय टी-20 द्विदेशीय मालिकेत (किमान पाच सामने) सर्वाधिक 231 धावांचा विक्रम विराटने केला. त्याने लोकेश राहुलचा 224 (वि. न्यूझीलंड, 2020) व कॉलीन मुन्रो 223 (वि. वेस्ट इंडिज, 2017) यांचा विक्रम मोडला.
आंतरराष्ट्रीय टी-20 सर्वाधिक 18 वेळा 200+ धावा करण्याचा विक्रमही टीम इंडियाच्या नावावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया (14), द. आफ्रिका (13), न्यूझीलंड (11), इंग्लंड (10) व वेस्ट इंडिज (8) यांचा क्रमांक येतो.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply