Breaking News

पुन्हा लॉकडाऊनची छाया

लॉकडाऊन हा शब्द तमाम सर्वसामान्य भारतीयांच्या कानावर पडला आणि जगण्याचा भाग होऊन बसला त्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारला जात असल्याची घोषणा केली. सर्वसामान्यांना कोरोना म्हणजे काय, लॉकडाऊन म्हणजे नेमके काय काहीच नीटसे कळत नव्हते. वर्षभरात दोन्ही पुरते कळून चुकले असून दुर्दैवाने लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीला पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या शक्यतेने अनेकांना धास्तावले आहे. त्यांची ही भीती अनाठायी नाहीच.

देशातील विशेषत: महाराष्ट्रातील परिस्थिती निश्चितच अतिशय चिंताजनक आहे. 2021मधील देशातील सर्वाधिक 276 कोविड मृत्यूंची नोंद मंगळवारी झाली. नव्या दैनंदिन केसेसही 47,281 इतक्या नोंदल्या गेल्या. ही संख्या 11 नोव्हेंबरनंतर प्रथमच इतकी अधिक नोंदली गेली आहे. देशाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेसपैकी 75.2 टक्के केसेस या महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये आहेत. देशभरातील अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.7 टक्के इतका आहे. ही सारीच आकडेवारी महाराष्ट्रातील जनतेकरिता निश्चितच धडकी भरवणारी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपार्ट असणे गुजरातने बंधनकारक केले आहे तर उत्तर प्रदेशने होळीच्या सणाच्या तोंडावर रेल्वेस्थानके व बसस्थानकांवरील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. होळीकरिता मुंबई, दिल्लीहून राज्यात परतणारे लोक सोबत कोरोना संसर्ग घेऊन येतील अशी भीती तेथील प्रशासनाला वाटते आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण मंगळवारी थेट 127 टक्क्यांनी वाढलेले दिसले. सोमवारी राज्यात 58 कोरोना मृत्यू नोंदले गेले होते तर मंगळवारी हा आकडा 132 वर गेला. राज्यात बीड, नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये 4 एप्रिलपर्यंत लॉकडॉऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतरही अनेक ठिकाणी कठोर निर्बंधांची घोषणा होऊ लागली आहे. मुंबईत आयुक्तांना होळीसह अन्य धर्मियांच्या सर्व सणांच्या उत्सवांवर निर्बंध लादणे भाग पडले आहे. केंद्रानेही गर्दी टाळण्याची संपूर्ण दक्षता राज्यांनी घ्यावी अशी सूचना जारी केली आहे. सध्या देशभरात आढळणार्‍या कोरोना विषाणूच्या विविध स्वरुपांबाबतचे तपशील प्रसारमाध्यमांमध्ये दिसत आहेत. पंजाबमधील कोरोना रुग्णांपैकी 81 टक्के रुग्णांमध्ये ब्रिटनमधील नवा कोरोना विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू दुप्पट वेगाने पसरतो तसेच त्याची बाधा तरुणांना अधिक प्रमाणात होते असे म्हटले जाते आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी बुधवारी महाराष्ट्र व पंजाबमधील परिस्थितीबाबत विशेष चिंता व्यक्त केली. पाठोपाठ गुजरात आणि मध्य प्रदेशातही केसेस वाढत आहेत. एकीकडे कोरोना आघाडीवर महाराष्ट्रातील परिस्थिती चिंता वाढवणारी असताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी मात्र अनेक खळबळजनक आरोपांचे खंडन करण्यात गुंतलेली दिसते. देशात कोरोना अवतरल्यापासून सातत्याने महाराष्ट्रानेच देशातील कोरोना केसेसमध्ये सर्वाधिक भर घातली आहे आणि अद्यापही परिस्थिती तशीच आहे. वेगाने लसीकरण राबवण्याची आता आत्यंतिक गरज असून कदाचित त्यातून भारतीय समाजात हर्ड इम्युनिटी अवतरेल व आपण दुसर्‍या-तिसर्‍या लाटेतून तरून जाऊ शकू असा सूर तज्ज्ञ मंडळी लावत आहेत. पण स्वत:च्याच गैरकारभाराच्या भोवर्‍यात गुरफटत चाललेले आघाडी सरकार कोरोनाला पुन्हा एकदा कसे आणि किती थोपवू शकणार हा प्रश्नच आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply