Breaking News

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

तेलंगणा ः वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी (दि. 24) झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. तेलंगणा सूर्यापेठ येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून आरामात बाद फेरीत प्रवेश केला, तर मुलांनी इ गटात  तामिळनाडूला 38-20 असे पराभूत करीत गटविजेते म्हणून बाद फेरी गाठली. मुलांची विदर्भशी, तर मुलींची छत्तीसगडशी उपउपांत्यपूर्व लढत होईल.
याआधी मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाला 62-12 असे नमवित सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. मध्यांतराला 37-07 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने नंतरदेखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. दुसर्‍या दिवशीही तोच जोश दाखवित पंजाब या बलाढ्य संघाला आठ गुणांनी नमवित साखळीतील सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुलींनी ह गटात प्रथम स्थान पटकावित बाद फेरी गाठली. हरजितसिंग, मानसी रोडे, समृद्धी कोळेकर, कोमल ससाणे या महाराष्ट्राच्या दोन्ही विजयांत चमकल्या.
महाराष्ट्राच्या मुलांनी इ गटात बुधवारी सकाळी झालेल्या सत्रात तामिळनाडू या बलाढ्य संघाला नमवले. पूर्वार्धातच दोन लोण देत मुलांनी विश्रांतीलाच 28-09 अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत ती आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. या अगोदर रात्री उशिरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगढला 74-23 असे सहज नमवले. मध्यांतराला 37-11 अशी भक्कम आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने उत्तरार्धातदेखील आक्रमक खेळाची झलक दाखवत हा सामना सहज खिशात टाकला. या दोन्ही सामन्यांत आकाश रुडाले, तेजस पाटील, शुभम पटारे, रोहित बिन्नीवाले, सुरेश जाधव यांनी चढाई-पकडीचा सर्वोत्तम खेळ केला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply