उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्यावर नेहमीप्रमाणे मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या नागावचे प्रभाकर म्हात्रे (वय 63) यांना भुरळ आल्याने समुद्रातील लाटात ते बुडू लागला. समुद्राच्या पाण्यात कोणी तरी बुडत असल्याचे ओएनजीसी प्रकल्पातील पिरवाडी किनार्यावर गस्त घालणार्या सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले असता त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता बुडत असणार्या म्हात्रे यांचे प्राण वाचवले.
उरण नागाव गावातील रहिवाशी प्रभाकर म्हात्रे हे बुधवारी (दि. 31) नेहमीप्रमाणे पिरवाडी समुद्र किनार्यावर मच्छी पकडण्यासाठी गेले होते. उन्हाचा कडाका असल्याने मच्छी पकडत असताना त्यांना भुरळ आली. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रातील लाटांमुळे ते बुडू लागले. त्याचवेळी किनार्यावर गस्त घालत असलेल्या ओएनजीसी प्रकल्पातील विजय माने व लालू एस या दोन सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले की, समुद्रातील पाण्यात कोणी तरी व्यक्ती बुडत आहे. दोन जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रात बुडत असलेल्या व्यक्तीला किणार्यावर काढण्यासाठी समुद्रातील पाण्यात उड्या मारल्या. त्यामुळे मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या प्रभाकर म्हात्रे या इसमाचे प्राण वाचले आहे. हा चित्तथरारक प्रसंग पिरवाडी किनार्यावर आलेल्या पर्यटकांनी पाहिला आणि त्यांनी जवानांचे अभिनंदन केले.