कळंबोली, खारघर, तळोजात बसणार हवा गुणवत्ता मोजणी स्थानक
पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात कळंबोली खारघर व तळोजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या हवेमध्ये प्रदुषण असल्याचे कृत्रिम पुप्फुसांद्वारे सिद्ध झाले होते. त्याचअनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर आणि काही स्वयंसेवी संस्थांनी या ठिकाणच्या हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने स्वयंचलित यंत्रणा बसवावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. कळंबोली खारघर व तळोजा या ठिकाणी स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजणी स्थानकास सुरू करण्याबाबत मुख्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आली.
मुंबईचे प्रवेशद्वार असणार्या पनवेल परिसराला महानगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत चालले आहे. त्याचबरोबर वेगवेगळे प्रकल्प या परिसरात येऊ घातले आहेत. या परिसरातून महामार्ग जात असल्याने वाहनांची वर्दळ मोठी आहे. विशेष करून सिडको वसाहतीत लोकवस्ती जास्त आहे. त्या तुलनेत स्वयंचलित वाहने सुद्धा या ठिकाणी आहेत. या व्यतिरिक्त तळोजा औद्योगिक वसाहत अगदी जवळच आहे. या ठिकाणी रासायनिक कारखान्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय फिशरी कंपन्या सुद्धा आहेत. येथुन धूर हवेत सोडला जातो. त्यामध्ये विषारी वायूंचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. परिणामी या भागात सकाळी आणि रात्री उग्र वास येतो. श्वसनाला त्रास होत असल्याच्या तक्रारी खारघर आणि कळंबोली परिसरातून येत आहेत. याशिवाय कासाडी नदीत औद्योगिक सांडपाणी सोडण्याच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. यामुळे हवे बरोबरच जलप्रदूषण ही होत आहे. तसेच औद्योगिक कचरा मोकळ्या जागेत टाकला जात आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. पनवेल परिसरातील हवा दुषित होत चालली आहे. त्याचे मोजमाप करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या प्रदूषण नियंत्रण महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नाही. त्यामुळे हवा नेमकी कुठून दूषित होते. त्यामध्ये दूषित घटकांचे प्रमाण किती आहे. किती प्रदूषण होते या गोष्टींची माहिती मिळत नाही. हवेतील विषारी वायू सोडले जात असल्याकारणाने येथील रहिवाशांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. दरम्यान प्रदूषण महामंडळ जुजबी कारवाई करून विषय सोडून देत असल्याने दिवसेंदिवस प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे.
कळंबोली येथील स्वयंचलित हवा गुणवत्ता मोजणी (सीएए क्युएमएस) स्थानकास पनवेल महानगरपालिकेतर्फे 13 मार्च 2020 रोजी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे. तसेच तळोजा व खारघर येथील स्थानकांबाबत मंजूरीचा प्रस्तावदेखील मुख्यालयास सादर केला करण्यात आला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
जानेवारी महिन्यात खारघरमध्ये वातावरण फाऊंडेशनने प्रदूषणाची गुणवत्ता तपासण्यासाठी कृत्रिम फुफ्फुस बसविले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी करून हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी स्वयंचलित बोर्ड बसविण्यात यावेत अशी मागणी राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी सचिन आडकर यांनी दिली.