महाड प्रशासनाची जय्यत तयारी; नागरिक मात्र धास्तावले
महाड : प्रतिनिधी
एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान माजवले असतानाच महाड सारख्या ग्रामीण भागात प्रशासन करत असलेल्या जय्यत तयारीने नागरिक मात्र धास्तावले आहेत. कोरोनाच्या या अवास्तव प्रचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाडमध्ये देखील उलटसुलट अफवा निर्माण होत आहेत. आजार कमी आणि अफवा अधिक असे चित्र यामुळे निर्माण झाले आहे. महाडमध्ये कोरोना व्हायरसबाबत सर्वसामान्य माणसात भय निर्माण झाले आहे. यामध्ये सोशल मिडिया देखील नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यात एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे. महाडमधील शाळा देखील पुढील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. तर 20 मार्च रोजी होणार्या चवदारतळे स्मृतिदिनानिमित्त होणार्या अभिवादन सभा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. महाड आरोग्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये कोरोनो संशयितांसाठी कोरोनटाईन सेंटर उभे करण्यात येत आहे. डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 10 खाटांचे या सेंटरमध्ये बाहेरून येणार्या नागरिकांमधील संशयित रुग्णांची तपासणी, प्राथमिक औषधोपचार आणि जेवणासहित राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना लागण झालेला रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ मुंबई किंवा पुणे येथे स्थलांतर करण्यात येईल. महाड शहराच्या बाहेर वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे सेंटर सुरु करण्यात होते मात्र तेथील नागरिकांनी याला विरोध दर्शवला यामुळे हे सेंटर आता राष्ट्रीय स्मारकात सुरु होत आहे.
महाडमध्ये बाहेरून आलेले नागरिकांची यादी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सद्या केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तयारी केली जात आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून जावू नये.
-डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक, महाड