गोल्डन क्रॉस म्हणजे निफ्टी 50ची मध्यम कालावधीची चलत सरासरी व निफ्टी 50ची दीर्घ कालावधीची सरासरी यांचा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. निफ्टी 500 निर्देशांकामधील सर्व कंपन्या ह्या गोल्डन क्रॉसच्यावरच आहेत. याचा अर्थ तेजीची नांदी. या तेजीत कंपन्यांच्या चांगल्या वार्षिक निकालांची भर पडण्याची शक्यता असल्याने नफ्याचे सातत्य असणार्या कंपन्यांकडे आता लक्ष ठेवले पाहिजे.
सर्व पाप परिहरो रक्त प्रोक्षणम् आवश्यकम्
तद् रक्तं परमात्मने पुण्यदान बालियागम्
हे प्रभू येशूबद्दलचं वर्णन आपल्याला श्लोकामध्ये आढळतं. अर्थ – सर्व पापांचा परिहर करण्यासाठी रक्ताचं शिंपडलं जाणं आवश्यक आहे, ते रक्त देवाचं म्हणजे परमात्म्याचं असावं जे त्याच्यापासून स्वेच्छेनं बलि-दान म्हणून दिलेलं असावं. शुक्रवारी, ख्रिस्ती बांधवांमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा उत्तम शुक्रवार (गुड फ्रायडे) साजरा झाला, याच गुड फ्रायडेच्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मानवजातीच्या पापांसाठी क्रॉसवर बळी दिलं गेलं व तिसर्या दिवशी, रविवारी पुनरुत्थान दिवशी (ज्याला लोक ईस्टर संडेदेखील म्हणतात) तो मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत होऊन उठला. त्यामुळं तो पवित्र क्रॉस ख्रिस्तीजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण त्या क्रॉसवर स्वतःचं बलिदान देऊन प्रभु येशू ख्रिस्तानं मानवजातीस सार्वकालिक जीवनाची आशा दिली. तशाच प्रकारे अजून एक क्रॉस आपल्या बाजारासाठी आशा देत असतो ज्याला गोल्डन क्रॉस म्हटलं जातं.
पहिला क्रॉस हा अत्यंत पवित्र असून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो, तर दुसरा क्रॉस आपल्याला निफ्टीचं, म्हणजेच बाजाराचं भवितव्य सांगू पाहतो. गोल्डन क्रॉस म्हणजे निफ्टी 50ची मध्यम कालावधीची चलत सरासरी व निफ्टी 50ची दीर्घ कालावधीची सरासरी यांचा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. मागील वर्षी 7 ऑगस्ट रोजी याबद्दल मी उल्लेख केलेला होता जेव्हा निफ्टी निर्देशांकानं दैनिक आलेख-तक्त्यावर हा गोल्डन क्रॉसओव्हर केलेला होता. तेव्हा निफ्टी होती, 11214. असो. अनेक राज्यांत विविध शहरात टाळेबंदी चालू झाल्यामुळं पुन्हा गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा न आल्यासच नवल, परंतु अशांसाठी हा गोल्डन क्रॉस कामाला येतो. तूर्ततरी, निफ्टी 500 निर्देशांकामधील सर्व कंपन्या ह्या गोल्डन क्रॉसच्या वरच आहेत. अशा कंपन्या पडत्या बाजारात हेरावयास उजव्या.
सध्या बाजार जरी दोलायमान असला तरी भविष्यातील तेजीची ही नांदी ठरू शकते. आता मागील आठवड्यात नुकतीच होळी पार पडली आणि म्हणतात ना, होळी जळो आणि थंडी पळो.. परंतु आजकाल होळीच्या आधीच थंडी कोठेतरी लुप्त झालेली असते व होळीपासून वाढत चाललेल्या उष्म्यात, रखरखाटात झाडे, वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव्यासाठी आसावलेले दिसतात. जमिनीवरची ओल सुकून गेलेली असते आणि दिवसभराच्या तापमानात चांगलाच बदल जाणवायला लागतो. पहाटे पहाटे पांघरूण ओढावेसे वाटायला लावणार्या थंडीची कौतुकं बंद होण्याच्या मार्गावर असतात आणि दुपारी आपसूकच मग पंखे, आता एसी ऑन व्हायला लागतात. तपमापकाचे आकडे हळूहळू चढायला लागतात. अशा या वसंत ऋतूची चाहूल लागते ती म्हणजे मोहोरलेल्या आम्रवृक्षाच्या देखाव्यानं, आणि त्यातून स्वतःची ओळख लपवून कंठ काढणार्या कोकीळमुळं. शिशिरात निष्पर्ण झालेल्या वृक्षांवर कोवळी कोवळी, तांबूस-पोपटी पालवी नजाकत आणत असते तर त्याजबरोबर विविध कुसुमांचीदेखील बहरण्यासाठी चढाओढ लागलेली दिसते. कुठेतरी सांगाड्यासारखे उभे असलेले पळस, पांगारा, सावरी आपल्या अंगावर लाल, गुलाबी, केशरी रंगाच्या फुलांची उधळण करत आपलं वेगळंपण जपत असतात, तर शानदार गुलमोहोर उमलून आलेले केशरी तुरे घेऊन दिमाखात उभा असतो, त्यालाच जणू काही खिजवत बहावा आपला पीत डौल बाळगून हसतो. अशा रखरखीत दुपारी खरबूज-कलिंगडाची दुक्कल कोणास खुणावत नसेल तरच नवल. मग कललेल्या उन्हात तप्त मातीचा एक वेगळाच गंध संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणाशी हातमिळवणी करण्यास तत्पर वाटतो. त्यात आंबट-गोड अननस, व मधूर द्राक्षं यांजबरोबरीनं फळांच्या राजाच्या आगमनाआधी स्ट्रॉबेरी व लिची या भाव खाऊन जातात. अगदी भर दुपारी चहाच्या अमृततुल्यामधील गर्दी हळूहळू आपसूकच तृष्णाशांतीसाठी डेरेदार झाडाखालील ताक, नीरा व सरबतं शोधू लागते, तर संध्याकाळची वेळ मार्गी लावण्यासाठी काही शौकीन मग मदिरेचा सहारा घेतात. या काळात शरीरशक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस संत्री, द्राक्षं, कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी, लिची, अननस, आंबे, फणस, जांभूळ, जाम अशा एक ना अनेक फळांद्वारे भरभरून देत असते. या काळात दिवसाचा, उन्हाचा, तप्ततेचा काळ मोठा व शांततेची, थंडाव्याची रात्र लहान ! हे वर्णन सहज सांगून जाते की कोणत्या ऋतूची ही चाहूल आहे..अगदी ज्याप्रमाणे एक ऋतू सरला की पुढील ऋतूची चाहूल आपसूक लागतेच, अगदी त्याचप्रमाणं आता बाजारास कंपन्यांच्या वार्षिक निकालाची चाहूल लागलीय. आज पाहुयात मागील महिन्यांत कोणत्या कंपन्यांचे आर्थिक निकाल उजवे ठरले आहेत..
आपण मागील लेखांमध्ये पाहिलेल्याच गोष्टींच्या अनुषंगानं याचा अभ्यास करता येईल. ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा एकूण 69 कंपन्या विचारात घेतलेल्या असून त्यांची क्रमवारी मागील पाच वर्षांत सर्वांत जास्त सरासरी नफ्यामधील वाढ दर्शवणारी कंपनी सर्वप्रथम अशाप्रकारे आहे. पैकी 28 कंपन्यांचीच मागील पाच वर्षांमधील नफावृद्धीची सरासरी ही 10 टक्क्यांच्या वर आहे. यावरून ब्लूचिप कंपन्यांव्यतिरिक्त सुद्धा कोणत्या कंपन्यांकडं या रिझल्ट सीझनमध्ये लक्ष ठवून त्यांना लक्ष्य करता येऊ शकतं याची पूर्वतयारी नक्कीच करता येईल.
सुपरशेअर – जेएसडब्लू स्टील
जागतिक बाजारपेठेत मूळ धातू म्हणजे लोखंड, तांबं, जस्त इत्यादी. या उद्योगांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बरीच प्रगती दिसत आहे, कारण आर्थिक घडामोडींचा वेग वाढला असून अप्रत्यक्षपणे धातूंना मागणी वाढत आहे. परिणामी या वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यातच बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी पुढील आठ वर्षांत अमेरिकी 2.25 ट्रिलियन डॉलर्स किंमतीच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाची योजना जाहीर केल्यानंतर धातू कंपन्यांच्या शेअर्सना उधाण आलं. देशातील कंपन्या प्रति टनामागे 2500-4000 रुपयांची दरवाढ अपेक्षित ठेवत आहेत. बाजारासदेखील या कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांकडून याच अनुषंगानं चांगली अपेक्षा आहे. जेफरीज या रिसर्च फर्मच्या जागतिक धातू व खाण संघानं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की एकूण जागतिक स्टीलच्या उत्पादन क्षमतेचा 81-82 टक्के वापर होईल जो मागील दशकातील सर्वोच्च असेल आणि 2021-22 मध्ये लोह धातूची कमतरता राहील. ज्यामुळं किंमती अजून वाढू शकतील. भारतातील जिंदाल स्टील पॉवर कंपनीच्या मासिक व्यवसाय वर्तमानांनुसार डिसेंबरमध्ये कंपनीनं आतापर्यंतचं सर्वांत जास्त उत्पादन व विक्री केलेली आहे. जिंदाल साऊथ वेस्ट या समूहापैकी प्रामुख्यानं स्टील उत्पादक कंपनी म्हणजे जेएसडब्लू स्टील. अलिबागमधील इस्पात कंपनी आपल्यात सामावून घेतल्या नंतर जेएसडब्लू स्टील ही भारतातील दुसर्या क्रमांकाची खाजगी कंपनी आहे. कंपनीनं नुकतंच वेलस्पन कॉर्पोरेशनच्या हाय-ग्रेड स्टील व कॉईल व्यवसायाचं अधिग्रहण केलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जेएसडब्ल्यू स्टीलला त्याचे मूल्य वर्धित आणि विशेष उत्पादनांचे पोर्टफोलिओ वाढविण्याकरिता प्लेट्स आणि कॉइल मिल डिव्हिजनला विशेष महत्त्व असेल, विशेषत: प्लेट मिल्स ज्या विभागात आतापर्यंत कंपनी अस्तित्वात नव्हती. मार्च 2020 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात प्लेट्स आणि कॉईल मिल विभागाची उलाढाल 539.9 कोटी रुपये इतकी होती. एकूणच आठवडाभरातील धातू शेअर्समधील तेजी आणि त्यात जेएसडब्लू स्टील कंपनीचं अधिग्रहण व सूतोवाच यांमुळं हा शेअर मागील आठवड्यातील सुपरशेअर ठरला. एका आठवड्यात 14 टक्के वाढ नोंदवत या शेअरनं 512.95 हा आपला सर्वोच्च भाव नोंदवला.
-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com