राज्यातील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 3) ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ही घोषणा केली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधल्या काळात आपण ऑनलाइन, ऑफलाइन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. खरेतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणीदेखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना थेट पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे.
नववी ते अकरावीबाबत लवकरच निर्णय
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन व्हायला हवे, मात्र या वर्षी ते होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी वर्गोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या.