Breaking News

दिवस सारखे नसतात, हे सांगणारा भांडवली बाजाराचा आशावाद!

कोरोनामुळे मूळ अर्थव्यवस्था एकीकडे तर शेअर बाजार दुसरीकडे, असे चित्र सध्या जगभर पाहायला मिळते आहे. भारतीय बाजारही त्याला अपवाद नाही. अशा या उलट्या प्रवासाची कारणे समजून घेतली की भांडवली बाजाराचा आशावाद कसा काम करत असतो, हे लक्षात येते.

शेअर बाजारातील घडामोडींकडे अलीकडे आपले किती लक्ष गेले माहीत नाही, पण तेथे जे चालले आहे, ते सर्व विस्मयकारक आहे. कोरोनाच्या साथीमुळे सर्व जगाची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असताना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील शेअर बाजारांना उधाण आले आहे. त्याची जी कारणे सांगितली जात आहेत, त्याचा आपण पुढे विचार करूच, पण तेथे सध्या नेमके काय चालले आहे, ते पहा.

कोरोनाच्या काळात म्हणजे गेल्या फेब्रुवारीमध्ये या शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने नवा उच्चांक (52 हजार) प्रस्थापित केला. जेव्हा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गेल्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले होते, तेव्हा तो 27 हजार अंश इतका खाली होता. म्हणजे केवळ वर्षभरात त्याने दुप्पट उडी मारली. अर्थव्यवस्थेची चाके रुतलेली असताना हे होते आहे, याची जेव्हा चर्चा वाढू लागली, तेव्हा म्हणजे फेब्रुवारीअखेरीस तो 46 हजार इतका खाली आला होता. पण गेले काही दिवस त्याला पुन्हा जोर आला असून गेल्या शुक्रवारी त्याने पुन्हा 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. दुसर्‍या शब्दांत शेअर बाजारातील गुंतवणूकदार 2.9 लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आणि शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारमूल्य 207 लाख कोटी रुपयांवर पोहचले! हे आकडे म्हणजे किती रुपये, हे एकदा वाचून सहज लक्षात येत नाहीत, इतके ते मोठे आहेत. त्याचा आणि आपला संबंध क्वचितच येतो, एवढेच.

* बाजाराला उधाण आल्याची कारणे

आता आपण पाहू की भारतातील आणि जगातील शेअर बाजारांना उधाण का आले आहे? त्याची काही कारणे अशी- 1. सर्व सरकारांनी नेहमीची आर्थिक शिस्त बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून आपल्या देशांत तरलता वाढविली आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून पैसा ओतला आहे. त्याचा फायदा शेअर बाजार घेत आहेत. 2. सर्व दिवस सारखे नसतात, असे आपण म्हणतो. आणि शेअर बाजारही तेच मानतो. त्यामुळे लॉकडाऊन उठले आणि लसीकरण सुरू झाले की बाजाराचा आशावाद लगेच वाढला. (अर्थात, दुसर्‍या लाटेच्या भीतीने लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने काय होते, ते आता पाहायचे.) 3. लॉकडाऊनच्या काळात शेअर बाजाराच्या कमाईकडे अनेकांचे लक्ष गेले आणि ते प्रथमच शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले. अगदी भारताचाच विचार करावयाचा तर गेल्या वर्षभरात एक कोटी भारतीय नागरिकांनी शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. या एक कोटी नागरिकांनी अगदी सरासरी 20 हजारच रुपये बाजारात टाकले आहेत, असे गृहीत धरले तर ते होतात, 20 हजार कोटी. म्हणजे एवढा प्रचंड पैसा शेअर बाजारात नव्याने आला आहे. 4. आत्मनिर्भर भारत या सरकारच्या मोहिमेंतर्गत देशातील उद्योगांना एकप्रकारे नव्या संधी उपलब्ध झाल्या असल्याने त्या कंपन्यांचा नफा यावर्षी वाढला आहे. त्यामुळे त्या कंपन्यांना असलेली बाजारातील मागणी वाढली आहे. 5. कोरोनाचा प्रसार जेव्हा मधल्या काळात कमी झाला होता, त्यावेळी युरोपच्या तुलनेने भारताची स्थिती खूपच लवकर पूर्वपदावर आली होती. त्याचाही बाजारावर परिणाम झाला.कारण भारतातील मागणी आणि भारतात होत असलेल्या आर्थिक सुधारणांविषयी परकीय गुंतवणूकदार प्रचंड आशावादी असून ते भारताच्या शेअर बाजारात प्रचंड पैसा ओतत आहेत. 6. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विपरीत परिणाम असंघटित उद्योग व्यवसायांवर जास्त झाला आहे. शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या कंपन्या मात्र संघटीत क्षेत्रात मोडतात. त्या तात्पुरत्या आर्थिक प्रश्नांवर मात करू शकतात. 7. भारत सरकारने अर्थसंकल्पात सरकारी खर्च वाढविण्याचा निर्णय घेतला. खासगी उद्योजक नव्या गुंतवणुकीला तयार नसताना सरकारला हे करावेच लागते. ते सरकारने केल्यामुळे आर्थिक व्यवहारांना वेग मिळाला. 8. शेअर बाजारातील गेल्या वर्षभरातील तेजी ही प्रामुख्याने औषध, आयटी आणि जीवनावश्यक वस्तू निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांमधील तेजी आहे. कोरोनामुळे रुग्णालये आणि औषधांना मागणी वाढली, डिजिटलायझेशन आणि आर्टिफीसिशयल इंटलीजियन्सच्या वाढत्या वापरामुळे आयटी, तर काहीही झाले तरी जीवनावश्यक वस्तूंना प्रचंड लोकसंख्येमुळे मागणी राहणारच, या वस्तुस्थितीमुळे त्या क्षेत्रातील कंपन्यांना मागणी वाढली आहे.

* अमेरिकेचे ते दोन ट्रीलीयन डॉलर

आता मुद्दा असा आहे की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, असे आपण म्हणतो, तेव्हा बाजारातील मागणी कमी झाली आहे, असेच आपण म्हणत असतो. पण वेगवेगळ्या उपायांनी ही मागणी टिकून राहील, असे प्रयत्न सरकार करत असते. तसे प्रयत्न या काळात अनेक झाले आहेत. उदा. अमेरिकेने गेल्या आठवड्यात पायाभूत सुविधांवर तब्बल दोन ट्रीलीयन डॉलर म्हणजे जवळजवळ भारताच्या जीडीपी इतकी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगात धातूंना आणि आयटी सेवांना मागणी वाढेल. त्याचा परिणाम भारतातील धातू आणि आयटी क्षेत्राला चांगले दिवस येणार, या आशेने या दोन्ही क्षेत्रातील कंपन्यांनी अलीकडील तेजीत भाग घेतला आहे. भारत सरकारनेही चार सरकारी बँकांमध्ये 14 हजार 500 कोटी रुपयांचे भांडवल टाकण्याचा निर्णय घेतल्याने बँकिंग क्षेत्रही तेजीत भाग घेताना दिसते आहे. या बँकांत आलेल्या भांडवलामुळे देशातील क्रेडीट एक्सपांशनला (पतसंवर्धनाला) गती मिळणार आहे. याचा अर्थ एकच, तो म्हणजे कोरोनाचे संकट कितीही गंभीर असले तरी त्याचा मुकाबला करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे हा बाजार मानतो आणि प्रत्येक उपाययोजना जाहीर झाली की नवा आशावाद निर्माण करतो. मुळात शेअर बाजारच अशा आशावादावर चालतो, असे म्हणतात. त्याचीच प्रचिती गेल्या वर्षाने आपल्याला दिली आहे. या आशावादाने जे हुरळून जातात त्यांचा कपाळमोक्ष ठरलेला आहे, मात्र त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणारे ती संधी पूर्ण हरवून बसतात, हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्यातील किती जोखीम आपण घेवू शकतो, याचा अंदाज करून त्यात राहण्याचा प्रयत्न करणे, एवढेच आपल्या हातात आहे.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply