Breaking News

मजुरांनी धरली गावची वाट

मुंबई, पुणे ः प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या मजूर, कामगार, मजुरांनी आपल्या मूळ गावी परतण्यास सुरुवात केली आहे. परिणामी हॉटेल, बांधकामसह अनेक क्षेत्रात कामगारांची कमतरता भासू लागल्याने नवा प्रश्न उभा राहिला आहे.
मुंबई, पुणे अशा शहरांसह आजूबाजूच्या परिसरात परराज्यांतील काम करणार्‍या मजुरांची मोठी संख्या आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यांना मूळ गावी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये काही मजुरांचा मृत्यूदेखील झाला, तर अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रचंड हाल झाले. त्याचा परिणाम शहर व आजूबाजूच्या परिसरातील उद्योगांवर झाला होता. गेल्या काही महिन्यात त्यापैकी बहुतांश कामगार पुन्हा कामाच्या ठिकाणी दाखल झाले होते.
दरम्यान, पुन्हा लॉकडाऊनची शक्यता गृहीत धरून शहरातील अनेक कामगारांनी आपली घरे गाठण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊन झाल्यास गेल्यावेळेस प्रमाणे हाल नको असे गृहीत गेल्या तीन ते चार दिवसांत मूळगावाकडे जाणार्‍या कामगारांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. काही तर गावात पोहचलेदेखील आहेत. कामगारांनी आधीच घरचा रस्ता धरल्यामुळे व्यावसायिकांपुढे अडचणी उभा राहिल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून गावी जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एलटीटी टर्मिनसमधून दररोज लांब पल्ल्याच्या 20 गाड्या चालविण्यात येतात. त्यात सर्वाधिक गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पटणाकरिता धावतात. यामध्ये मजुरांची संख्या मोठी आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply