गॅसजोडणीधारकांचे रेशन कार्ड रद्द होण्याची भीती
कर्जत : बातमीदार
स्वस्त धान्य दुकादारांकडील शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्यासाठी कर्जत तालुक्यात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांनी भरून द्यावयाच्या अर्जाच्या मागील भागात हमीपत्राचा मुद्दा दिला आहे. त्यात माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, याची मला जाणीव आहे, असे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. या अटीमुळे शिधापत्रिकाधारक संभ्रमात असून गॅस जोडणीधारकांची शिधापत्रिका रद्द होते की काय? अशी भीती सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त करत आहे.
तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी असून, त्यापैकी बहुतेकांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणीदेखील आहे. तालुक्यातील आदिवासी भागातदेखील गॅस जोडणी आहे, काही ठिकाणी तर आदिवासींना वन विभागाच्या वतीने मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्याचा उल्लेख सदरच्या हमीपत्रात देणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे रेशनकार्ड रद्द होते की काय, या संभ्रमात कार्डधारक आहेत.
गॅस जोडणी ही काळाची गरज आहे, केंद्र शासनाने उज्वला योजने अंतर्गत गरीब कुटूंबांना गॅस जोडण्या दिल्या आहेत. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता सर्वसामान्य गरिबांना शिधापत्रिका ठेवायची असेल तर गॅस जोडणी रद्द करावी लागेल आणि गॅस जोडणी ठेवायची असेल तर शिधापत्रिका रद्द करावी लागेल. त्यामुळे अनेकांच्या शिधापत्रिका रद्द होऊन गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहतील, अशी शक्यता आहे.
शिधापत्रिका तपासणी मोहीमे अंतर्गत तालुक्यातील सर्वच रेशनकार्डधारकांना फार्म भरून देण्यास सांगण्यात आले आहे. यात गरीब लोक स्वस्त धान्यापासून वंचित राहणार नाहीत. उज्वला योजने अंतर्गत गॅस जोडणी दिलेल्या आदिवासींनाही नेहमीप्रमाणे धान्य मिळणार आहे. सधन कुटूंबांची या तपासणी मोहीमेत माहिती घेण्यात येत आहे.
-विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत