300 एकरमधील वनसंपदा नष्ट; जनावरांच्या चार्याचाही प्रश्न
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील खांडस भागात शनिवारी (दि. 3)अचानक लागलेल्या वणव्यात तब्बल 300 एकर जमिनीवरील गवत, झाडेझुडपे जळून नष्ट झाली आहेत. त्यामुळे आता प्रामुख्याने या भागातील जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच पाणीटंचाई असलेल्या या भागात लागलेला हा वणवा सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरत आहे.
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून खांडस परिसर ओळखला जातो. भीमाशंकर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर असते. दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरु झाला की, या भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यात रोजगाराचे पर्याय उपलब्ध नसल्याने या भागातील खांडस आणि अंभेरपाडामधील लोकांना दुग्ध आणि पशुपालन व्यवसाय करावे लागतात. खांडस परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून तेथे जनावरे मुक्तपणे फिरताना दिसतात, मात्र मात्र शनिवारी लागलेल्या वणव्यात येथील वनसंपदा भस्मसात झाल्याने आता त्या जनावरांना ना चार उपलब्ध आहे ना झाडांची सावली.
शनिवारी लागलेल्या वणव्याने येथील जंगलाला आपल्या कवेत घेतले. ग्रामस्थ वानवा विझविण्यासाठी घटनास्थळी पोहचले, परंतु तोपर्यंत तब्बल 300 एकराचा परिसर वणव्याने काळाकुट्ट करून ठेवला होता. खांडस, काठेवाडीपासून अंभेरपाडापर्यंतचे जंगल नष्ट झाले. गवत, झाडाची पानेही जळून गेल्याने त्या परिसरातील सावलीदेखील नष्ट झाली आहे. खांडसचे सरपंच मंगल ऐनकर यांनी वन विभागाला वणव्या विषयी तात्काळ सूचित केले होते. मात्र वन विभाग त्या ठिकाणी पोहचण्याआधी जंगल नष्ट झाले होते.
जंगलातील झाडे आणि गवत हे उन्हाळ्यात जनावरासाठी महत्वाचे असते, मात्र ते सर्व जळून गेल्याने आपल्या पशुधनासाठी चार कुठून आणायचा, असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे.