उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यामध्ये गेल्या तीन महिन्यांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सुमारे 1350 हुन अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हा एक आगळावेगळा विक्रम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उरण तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या चार दिवसात 51 जणांना कुत्र्यांनी चावा-घेऊन गंभीर जखमी केले आहे.
यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त असून त्यांचे मोठे लचके तोडले आहेत, तर जानेवारी महिन्यापासून ते मार्चपर्यंत 1350 जणांना भटक्या कुत्रांनी घातक दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील भटक्या कुत्र्यांची दहशत खूप वाढली असल्याने नागरिक कोरोनापेक्षा कुत्र्यांच्या भीतीच्या सावटाखाली जास्त असल्याचे दिसून येत आहे. उरण तालुक्यातील करंजा, मोरा, फुंडे, बोकडविरा, जेएनपीटी वसाहत, चिरनेर पूर्व विभागातील बहुतांशी गावात भटक्या कुत्रांनी अनेकांना चावा घेण्याचे प्रकार घडले आहेत.
यामध्ये लहान मुलांना जास्त गंभीर दुखापती झाल्या असल्याचे समोर आले आहे. यांची दहशत एवढी वाढली आहे की, रस्त्यावरून जाणार्या कुणालाही हे कुत्रे विनाकारण चावा घेत असून, अनेकांच्या पायाचे लचके तोडले आहेत, तर अनेक लहान मुलांच्या डोक्यावर चावल्याने या मुलांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली अशा दोन्ही शासकीय ठिकाणी जानेवारी पासून ते आजपर्यंत 1350 जणांनी उपचार घेतला असून त्यांची नोंद तेथे करण्यात आली आहे.
उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जानेवारी महिन्यात 178, फेब्रुवारी महिन्यात 179, मार्च महिन्यामध्ये 202 आणि एप्रिल महिन्याच्या चार दिवसांमध्ये 22 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या नोंदी झाल्या आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली तेथे जानेवारी 234 फेब्रुवारी 312 मार्च 195 चार दिवसात 28 जणांनी उपचार घेतल्याची नोंदी आहेत. उरण तालुक्यामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दर तीन महिन्यांनी कुत्रे प्रजोत्पादन करीत असतात आणि एक कुत्री एकावेळी जवळजवळ सहा ते सात पिल्लांना जन्म देते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या ही वाढतच चालली आहे. येत्या काळात माणसांपेक्षा कुत्रे जास्त जाऊन माणसे त्यांची शिकार होऊ नये यासाठी वेळीच शासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरण हा त्यावरील उपाय असून नगरपालिकेप्रमाणे पंचायत समिती जिल्हापरिषदने पुढाकार घेऊन प्रत्येक तालुका पातळीवर निर्बीजिकरण केले, तर भटक्या कुत्र्यांवर आळा येऊन त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. पर्यायाने प्रशासनाने ही खबरदारी घेऊन तत्काळ यावर उपाय योजना करावी, अशी मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.
सध्या आमच्याकडे अँटी रेबीज इंजेक्शनचा साठा पुरेसा असून आमच्या कडून उपचार चांगल्या प्रकारे केला जात आहे.
-डॉ. राजेंद्र इटकरे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली