पटवर्धन काकूंची तब्येत गेले काही दिवस बरी नव्हती. आज पहाटे त्या गेल्या. मला त्यांची पहिली भेट आजही लख्ख आठवतेयं. आमचे लग्न ठरल्यावर मी पहिल्यांदा पनवेलला आले, तेव्हा माझी ओळख करून घ्यायला काकू घरी आल्या होत्या. गोरापान गोल चेहरा, हसरी तरी करारी नजर, बघताक्षणी एक आदरयुक्त जिव्हाळा वाटला. नवीन सुनेसाठी म्हणून त्या त्यांच्या बागेतल्या फुलांचा गजरा करून घेऊन आल्या होत्या. लग्नानंतर त्यांची वेळोवेळी भेट होतच राहिली. आमचे आई-पप्पा आणि पटवर्धन काका-काकूंची अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. आमच्यासाठी ती दोघे म्हणजे आमच्या कुटुंबातलेच ज्येष्ठ होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगात सहभागी होत असत.
काकूंची जसजशी ओळख होत गेली, तसतशी त्यांची अगत्यशीलता, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, धडाडी, शिस्तबद्ध काम करण्याची पद्धत, निर्णयक्षमता, एखादे काम करताना ते परिपूर्ण कसे होईल याकडे बारकाईने लक्ष पुरविणे, सर्वांना एखाद्या कामात सामावून घेणे आणि प्रत्येकाचा वकूब ओळखून त्यांच्याकडून कामे करवून घेणे, त्यांच्यातले सारे गुण प्रकर्षाने जाणवायला लागले.
पटवर्धन काका-काकू दोघेही सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर होते. काकांच्या आकस्मिक मृत्यूनंतरही काकूंनी सार्या सामाजिक कामांचा डोलारा समर्थपणे चालवला. पनवेल परिसरात गरीब रुग्णांसाठी कमीतकमी पैशात रास्त उपचार व्हावेत, या सामाजिक जाणिवेतून त्यांनी पटवर्धन हॉस्पिटल हे राष्ट्रीय जनकल्याण समिती कडे सुपूर्द केले. रायगड जिल्ह्यातील पहिले डायलिसीस सेंटर डॉ. पटवर्धन स्मृती रुग्णालयात सुरू केले गेले. नुकतेच तिथे आयसीयूदेखील सुरू करण्यात आले आहे. डॉ. पटवर्धन स्मृती रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना अत्यंत वाजवी दरात अद्ययावत उपचार मिळत आहेत.
पटवर्धन काकांचे जन्मगाव मेढे येथे त्यांनी समाजातील वंचित मुलांसाठी वसतीगृह चालवले. तेथे शाळेची इमारत बांधण्यात पुढाकार घेतला.
पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघ हॉल आणि क्रांतिवीर फडके विद्यालयातील सभागृह यांच्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक पाठबळ दिले. त्यांच्या ट्रस्टच्या कृष्णभारती हॉलमध्ये अनेक सामाजिक कार्यांसाठी कोणताही मोबदला न घेता हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येते. त्याच ठिकाणी जिजामाता बालवर्गदेखील सुरू केले आहेत. एकता महिला मंडळाचे काम हे नेहमीच त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचे काम होते. अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी त्यांनी मदत केली. समाजातील अनेक कामांना त्यांनी सातत्याने हातभार लावला. समाजानेदेखील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेकविध पुरस्कारांनी गौरविले. त्यांची स्मृती पनवेलकरांच्या मनात चिरंतन राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
-डॉ. समिधा ययाती गांधी, पनवेल