Breaking News

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्यास शिक्षा

माणगाव विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

माणगाव, पाली : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपी मोहन धोंडू शिर्के  (रा. शिळोशी, ता. सुधागड) याला माणगाव विशेष सत्र न्यायालयाने आठ वर्ष कारावास व  15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील अल्पवयीन  मुलगी (7 वर्ष 3 महिने) 1 एप्रिल 2021 रोजी घराच्या ओटीवर खेळत होती. तिच्या घरात कोणीही नाही त्याचा फायदा घेवून आरोपी मोहन धोंडू शिर्के (वय 45) याने खाऊचे प्रलोभन दाखवून तिला आपल्या घरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडित मुलीने तिचे घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पाली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी मोहन धोंडू शिर्के याच्यावर भादवि कलम 354,सह लैगिंक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 10 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केला.

या खटल्याची सुनावणी माणगाव येथील विशेष सत्र न्यायालयात झाली. अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील योगेश तेंडूलकर यांनी काम पाहिले.  पीडित मुलगी व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली.  साक्षीदारांची साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे न्या. पी.पी. बनकर यांनी आरोपी मोहन धोंडू शिर्के यास दोषी ठरवून सोमवारी (दि. 21) आठ वर्ष कारावास आणि 15 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply