विनामास्क फिरणार्यांवर कारवाई विनामास्क फिरणार्यांवर कारवाई
रोहे ः प्रतिनिधी
वीकेण्ड लॉकडाऊनमधील दुसर्या दिवशी रविवारीही रोहा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. किरणामाल, दुध, भाजी व वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी सकाळी तुरळक नागरिक घराबाहेर पडले होते. ग्रामीण भागातही शुकशुकाट होता.
वीकेण्ड लॉकडाऊनची रोहा तालुक्यात शनिवारपासूनच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शनिवारी शहारातील बहुतांशी दुकाने बंद होती. रविवारी सकाळी फक्त अत्यावश्यक सेवेतील मेडिकल स्टोअर, दवाखाने तसेच भाजीपाला, किरणामाल, मच्छी, वृत्तपत्र, दुधडेअरी अशी दुकाने उघडी होती. त्यामुळे बाजारात तुरळक लोक दिसत होते. काही ठराविक उघडे होते. दरम्यान, परिषद कर्मचार्यांनी शहारतील रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. रोहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्ष शेगडे, वाहतूक पोलीस हनुमंत धायगुडे हे पोलीस पथक व होमगार्ड यांच्या सहाय्याने शहरातील नवरात्न हॉटेलसमोर व अन्य नाक्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत होती. पोलिसांचे दामिनी पथकही बाजारपेठेत गस्त घालताना दिसत होते.
माणगाव : प्रतिनिधी
वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी रविवारीही माणगावकरांनी कडकडीत बंद पाळला असून, यापुढेही शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून माणगावकरांनी कोविड संकट दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले.
माणगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांतून दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सरकारच्या सूचनेप्रमाणे प्रशासन नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहे. या महामारीची साखळी तोडण्यासाठी गर्दी करू नका, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा, मास्कचा वापर करा, वेळोवेळी हाताला सॅनिटायझर लावा, आपले हात वारंवार साबण व पाण्याने स्वच्छ धुवा अशा सूचना प्रांताधिकारी दिघावकर यांनी केल्या आहेत.
पालीत दुसर्या दिवशीही प्रतिसाद
पाली : प्रतिनिधी
कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवड्यातील शनिवार व रविवार या दिवशी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. वीकेण्ड लॉकडाऊनच्या दुसर्या दिवशी रविवारी सुधागड तालुक्यातील पाली, पेडली, परळी व जांभूळपाडा बाजारपेठ व इतर गावात नागरिकांनी बंद पाळला. येथील मुख्य बाजार पेठेत जीवन आवश्यक वस्तूची आस्थापने वगळता बाकी आस्थापने बंद असल्याचे चित्र दिसून आले.
एसटी वाहतूक सेवादेखील ठप्प झाली होती. येथील रस्ते, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी सन्नाटा दिसून आला. चौकात महत्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात असून, ते विनाकारण फिरणार्यांवर कारवाईदेखील करीत आहेत.
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. यापूर्वी कोरोनाला हद्दपार करण्यात आपण यशस्वी ठरलो होतो, आता पुन्हा जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे.