Breaking News

कर्जतमध्ये दुसर्या दिवशीही कडकडीत बंद

कर्जत : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते रविवारीही एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेले रस्ते आज कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. मात्र रविवार असल्याने मच्छी, मटण मार्केट खुले होते.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध घातले होते, परंतु त्याला न जुमानता कर्जत शहरात दररोज मोठी गर्दी होत होती. कापड, हार्डवेअर, ज्वेलर्स दुकाने सोडता बहुतांश दुकाने उघडी हाती. काहींनी तर दुग्ध व्यवसायाचा परवाना नसतानासुद्धा दहा – बारा लिटर दुध विकण्यासाठी ठेऊन आपली अन्य वस्तू विक्रीची दुकाने बिनधास्तपणे उघडी ठेवली होती. आज सुद्धाही दुकाने उघडी होती. लॉकडाऊनमुळे भाजी व्यवसायिक कमालीचे वाढले आहेत. तसेच रस्त्या रस्त्यावर चिकन, मटण, मच्छीची दुकाने अनेकांनी थाटली आहेत. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग नक्कीच वाढू लागतो.

दरम्यान, वीकेण्ड लॉकडाऊनच्या आज दुसर्‍या दिवशीही कर्जत तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले होते.  रिक्षा, टॅक्सी बंद असल्याने सर्व स्टँड ओस पडले होते.कडाव व कशेळे भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तेथील व्यापारी वर्गाने तीन – चार दिवसांपूर्वी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व तो शंभर टक्के यशस्वीसुद्धा केला. रविवारीही  या भागातील दुकाने शंभर टक्के बंद होती. कर्जत बाजारपेठेत केवळ औषधे, दूध डेअरी ही दुकाने उघडी होती तसेच मटण – मच्छी मार्केट सुरू असल्याने थोडी फार वर्दळ होती.

नागोठण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

नागोठणे : प्रतिनिधी

शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या वीकेण्ड लॉकडाऊनला नागोठण्यात दुसर्‍या दिवशीसुध्दा  प्रतिसाद मिळाला. औषधे तसेच दूध विक्री दुकानांव्यतिरिक्त शहरात एकही दुकान उघडले नसल्याने रविवारी 100 टक्के बंद पाळण्यात आला.

नागोठणे येथील बसस्थानकावर सलग दुसर्‍या दिवशी रविवारी एकही एसटी बस आली नसल्याचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांनी स्पष्ट केले. सर्व एसटी बसेस शुक्रवारीच बस आगारांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी नागोठणे बसस्थानकात रात्रीच्या वस्तीची एकही बस नसल्याने येथून पहाटे सुटणार्‍या अलिबाग तसेच इतर संबंधित गाड्या सोमवारी सकाळी नसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सहा आणि तीन आसनी रिक्षाही येथे व्यवसायासाठी आल्या नव्हत्या.

या वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर एकही माणूस दिसत नसल्याने ही एकप्रकारे अघोषित संचारबंदी असल्यासारखे दिसून येत होते. मुंबई – गोवा महामार्गावरसुद्धा तुरळक प्रमाणात वाहने दिसून येत होती.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply