सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांचा उपोषणाचा इशारा
मुरूड : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र उद्ध्वस्त झाले असून, गेल्या 10 महिन्यांपासून या आरोग्य केंद्राची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे; अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी दिला आहे.
मुरूड तालुक्यातील आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या ताब्यात येत असून, या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत 21 गावांतील ग्रामस्थांना आरोग्य विषयक सुविधा मिळत असतात, मात्र निसर्ग चक्रीवादळाचा तडखा बसल्याने या आरोग्य केंद्राची पुरती वाताहत झाली आहे. केंद्राच्या इमारतीचे छप्पर उडून गेले असून, ते अजून बसू शकले नाहीत. त्यामुळे येथे येणार्या रूग्णांना इमारतीबाहेर तपासले जाते. ऑपरेशन थेटर कधी पडेल सांगता येत नाही, तर वॉर्डाचे छत या वर्षीचा पावसाळा काढू शकणार नाही, शौचालयही तुंबले आहे. मुख्य म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची सोय नाही. या आरोग्य केंद्राच्या इमारतीची पडझड झाली आहे, त्याला दहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही जिल्हा परिषदेने या इमारतीच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रायगड जिल्हा परिषदेकडून अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत असताना, आगरदांडा आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर व कर्मचारी यांच्या निवासस्थानांचीही दुरावस्था झाली आहे. या आरोग्य केंद्रा डॉक्टर व कर्मचार्यांची कमतरता भासत आहे.
आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करताना पिण्याचे पाणी व येथील अस्वच्छतेकडेही लक्ष द्यावे, अन्यथा या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते गायकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या या निवेदनाच्या प्रती गायकर यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी यांना पाठविल्यात.
आगरदांडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या केंद्राच्या दुरुस्तीसाठी सहा लाख रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामास सुरुवात होईल.
-डॉ. चंद्रकांत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, मुरूड