Breaking News

खोपोली नगर परिषदेचा स्वच्छोत्सव

शेकडो महिलांचा सहभाग; वेशभूषा आणि डोक्यावरील फेटा ठरला लक्षवेधक

खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगर परिषद परिक्षेत्रातील महिलांच्या सहभागातून स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्वच्छोत्सवाचा शुभारंभ घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पमाला अर्पण करून करण्यात आला. या वेळी उपस्थित शेकडो महिलांनी हिरव्या रंगाचा वेष परिधान करून डोक्याला केशरी रंगाचा जरी पटका बांधला होता. अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात उपस्थित सर्व महिलांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यावेळी व्यासपीठावर विविध संस्थातील पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. कुस्ती महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर पदक प्राप्त कुस्तीपटू मुलींनी स्वच्छतेचा संदेश देणार्‍या रॅलीचे मशाल घेऊन नेतृत्व केले. त्यांच्या मागे ई व्हेईकल अर्थात इलेक्ट्रिकल बाईक घेऊन प्रतिनिधीक स्वरूपात महिला सामील झाल्या होत्या. त्यांचे पाठोपाठ खोपोली शहरातील विविध संस्था, राजकिय संघटना, महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि शेकडो लहान थोर महिलांनी खोपोली शहरातून लायन्स क्लब ऑफ हॉलपर्यंत भव्य अशी रॅली काढली होती. स्वच्छते संबंधात जनजागृती करणार्‍या घोषणा दिल्या जात होत्या. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे सभागृहात मशालीचे विसर्जन करून भव्य रॅलीचे सभेत रूपांतर झाले. स्त्री शक्तीला प्रेरक प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. रामहरी धोटे सभागृहाच्या व्यासपीठावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे, उपमुख्याधिकारी गौतम बगळे, ऑफिस सुप्रिडेंट श्रीमती कदम, शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी कुमारी जयश्री धायगुडे, नोडल ऑफिसर दिपक खेबडे, अभियंता विनय शिपाई, डॉ. संगीता वानखेडे, माजी आरोग्य सभापती माधवी रिठे आणि शहर समन्वयक भक्ती साठेलकर उपस्थित होते. भक्ती साठेलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जयश्री धायगुडे, दिपक खेबडे आणि माधवी रिठे यांनी स्वच्छतेबद्दल शासनाच्या धोरणाचे आणि नागरिकांच्या जबाबदारी संबंधी विस्तृत विश्लेषण केले. आयोजनात सहभागी झालेल्यांचे खेबडे यांनी आभार मानले. जगदीश मरागजे आणि अदिती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

आनंद बाजाराचा शुभारंभ
खोपोली शहरातील विविध संस्था आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून ’आनंद मेळ्याचे’ आयोजन केले होते. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, माती पासून बनवलेले साहित्य, आयुवदिक औषधे आणि कचर्‍यापासून निर्माण केलेल्या सुंदर अशा वस्तूंची विक्री करणारे स्टॉल लावले होते. आनंद बाजाराचे उद्घाटन उपमुख्याधिकारी बगळे यांनी केले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply