नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून दोन महिन्यांपूर्वी आलेल्या नाका कामगारांनी नवी मुंबईतील नाके पुन्हा गजबजले होते, पण आता 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे ठेकेदारांची दैनंदिन कामे ठप्प झाल्याने अनेक नाका कामगारांनी गावची वाट धरली आहे, मात्र ज्यांना गावी जाण्यासाठी तिकिटाला पैसेही नाहीत, अशा नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने काही मजुरांनी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. शासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी बिगारी, मजूर, गवंडी, रंगारी, लादी कारागीर फारसे मिळत नाहीत. ठेकेदारांना कामासाठी 20 ते 25 मजूर लागतात. मात्र अनेक जणांनी गावचा रस्ता धरल्याने उर्वरित कामगार नाक्यावर कामाच्या शोधात दिवसभर बसून असतात. किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी तुर्भे, कोपरखैरणे, नेरूळ एलपी, घणसोली, नोसिल नाका, ऐरोली सेक्टर 3 या नाक्यांवर मजूर मिळेनासे झाले आहेत. जे आहेत ते एक-दोन तासांच्या छोट्या कामासाठी येत नाहीत. संपूर्ण दिवसाच्या आठ तासांच्या कामाची मजुरी 600 ते 700 रुपये घेतली जाते. महिला बिगारी 500 ते 550 रुपये, गवंडी (कडिया)ची मजुरी 1000 ते 1200 रुपये असून लादी बसविणारा कारागीर 1200 ते 1500 ब्रास 100 चौ. फुटासाठी घेतो.
पूर्वीसारखी मोठी कामे हल्ली मिळत नाहीत. दोन-चार दिवसांच्या कामानंतर पुन्हा नवे काम शोधावे लागते. त्यात कंत्राटदारांकडेही पुरेसे काम नाही. प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत असल्याने लोक घराचे बांधकाम, रंगरंगोटी, सुशोभीकरण टाळत होते. त्यामुळे मजुरांना काम मिळेनासे झाले, असे रबाले येथील बांधकाम ठेकेदार आनंद परमेश्वर यांनी सांगितले.
तीन-चार दिवसांपूर्वी नाका कामगारांची गर्दी असायची. आता प्रत्येक नाक्यावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके कमी दोन-चार मजूर उभे असतात. आम्हालाही पैशांची गरज असल्याने छोट्या-मोठ्या कामावर दिवस ढकलण्यापेक्षा जास्त मजुरी मिळेल तीच कामे स्वीकारतो, परंतु दोन दिवसांपासून कामे मिळत नसल्याने आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
-वसंत पिठोले, नाका कामगार, त्र्यंबकेश्वर