वांगणी स्थानकावर थरार
कर्जत ः बातमीदार
पॉईंटमन मयूर शेळके यांच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. वांगणी रेल्वेस्थानकात शनिवारी (दि. 17) ही घटना घडली. काळजाचा ठोका चुकवणारा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
वांगणी रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी 5च्या सुमारास मुलासह चालत होती. चालता चालता अचानक मुलगा प्लॅटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन रेल्वे रुळावर पडला. घाबरलेली अंध महिला मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत होती, मात्र फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. त्याच वेळी उद्यान एक्स्प्रेस स्थानकाच्या दिशेने येत होते. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचे आणि एक्स्प्रेस येत असल्याचे पाहून ड्युटीवर असलेले पॉइंटमन मयूर शेळके यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्मवर घेतले. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉइंटमनचे प्राण वाचले.
पॉइंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेल्वेमंत्र्यांकडून कौतुक
रेल्वे रूळावर पडलेल्या मुलाला वाचविणारे पाइंटमन मयूर शेळके यांच्या धाडसाची थेट रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दखल घेतली आहे. गोयल यांनी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करीत पॉइंटमन शेळके यांचे कौतुक केले आहे. पॉइंटमनने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लहान मुलाचा जीव वाचवल्याचे पाहून खूप अभिमान वाटतोय असे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.