Breaking News

शेतकर्याची शक्कल; मिळविले वालाचे अमाप पीक

कर्जत : प्रतिनिधी

यंदा पावसाळा लांबल्याने कडधान्याचे पीक कसे घ्यायचे? याची चिंता शेतकरी वर्गाला पडली होती. भात पिकाची कापणी झाली, तेव्हा शेतात चिखलच होता. नांगरणी करता येत नसल्याने कर्जत तालुक्यातील एका शेतकर्‍याने शक्कल लढवली. भात कापल्यानंतर त्याने चिखलावरच वाल पेरले आणि शेतात म्हशी नेऊन त्या शेतभर फिरविल्या. त्यानंतर वाल रुजला आणि वालाचे भरपूर पीक आले.  रायगड जिल्ह्यात भातपिक घेतल्यानंतर लगेचच कडधान्याचे पीक घेतले जाते. ज्या परिसरात कालव्याचे पाणी आहे, तेथे दुबार भातशेती पिकवली जाते. काही भागात भाजीपाला पिकवला जातो तर बहुसंख्य भागत कडधान्याचे पीक घेतले जाते. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होता. त्यामुळे भात पीक घेतल्यावर कडधान्याचे पीक घेण्यासाठी नांगरणी करणे अशक्य झाले होते. यंदा कडधान्याचे पीक कसे घ्यायचे? असा प्रश्न अनेक शेतकर्‍यांना पडला होता. कर्जत तालुक्यातील कोशाणे गावामधील एक शेतकरी हरिश्चंद्र ठोंबरे हे आपल्या शेतावर विविध प्रयोग करून नेहमीच चांगले पीक घेत असतात. त्यांनी भात कापल्यानंतर चिखलावरच वालाचे बी पेरले आणि शेतात म्हशी नेऊन, त्या शेतभर फिरविल्या. ही त्यांची शक्कल शंभर टक्के नामी ठरली. वालाचे बी रुजले आणि काही महिन्यात वालाचे भरपूर पीक आले. ठोंबरे यांनी यापूर्वी कलिंगड, मका, गहू, तूर, हरभरा आदींचे पीक घेतले आहे. कमी पाण्याचा वापर, मोजकेच मजूर, सेंद्रीय खताचा वापर करून कमी खर्चात जास्त पीक घेण्याचे त्यांचे प्रयोग अनेक शेतकरी करीत असतात. त्यातीलच हा प्रयोग अनेक शेतकर्‍यांना भविष्यात वरदान ठरणार आहे.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply