एका महिलेसह चौघांना बेड्या; 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अलिबाग ः प्रतिनिधी
सोन्याचे शिक्के देतो असे सांगून चक्क पितळेचे शिक्के देत गंडा घालणार्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे.
प्रभूभाई गुलशनभाई सोलंकी ऊर्फ कल्पेश प्रजापती, मणिलाल नारायण राठोड ऊर्फ महेश प्रजापती, अर्जुन भिकाभाई सोलंकी, आणि लक्ष्मीदेवी शंकर गुजराती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून फसवणूक करून लुटलेली 65 लाखांची रोकड आणि तीन लाख रुपये किमतीची कार असा 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली.
मांडवा सागरी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी सोन्याचे बनावट शिक्के देऊन तब्बल 65 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे येथील फिर्यादी हा मुंबई-मांडवा रो रो बोट सेवेने प्रवास करीत असताना दोन अनोळखी पुरुष व एक महिला त्यांच्या संपर्कात आले होते. खोदकाम करताना आपल्याला सोन्याचे शिक्के सापडले असून पैशाची खूप गरज असल्याने ते शिक्के विकायचे आहेत असे या तिघांनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कमी किमतीत सोन्याचे शिक्के मिळत असल्याने ते शिक्के त्यांच्याकडून 65 लाखाला खरेदी केले, परंतु आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. सोन्याचे शिक्के म्हणून हातात पितळेच्या धातूचे शिक्के ठेवल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने तत्काळ मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला. गुन्हे अन्वेषण विभागाने एक तपास पथक तयार करून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी,आणि टोळ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलीस हवालदार अमोल हंबीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर तपासाची सूत्रे हलली. मिळालेल्या माहितीनुसार असे गुन्हे करणारे आरोपी हे गुजरात राज्यातील वडोदरा, वलसाड भागात असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गुजरात गाठले. वडोदरा, वलसाड येथे 10 दिवस राहून आरोपींची माहिती घेतली आणि चकवा देणार्या आरोपींना शिताफीने अटक केली. यातील प्रभूभाई सोळंकी ऊर्फ कल्पेश प्रजापती वय (37), मणिलाल राठोड ऊर्फ महेश प्रजापती (52) आणि अर्जुन सोलंकी (25) यांना गुजरातमधून 12 एप्रिल रोजी, तर लक्ष्मीदेवी गुजराती (45) हिला 13 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील खडवली पडघा येथून ताब्यात घेतले. त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.