आमदार रविशेठ पाटील यांचे आश्वासन
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पाली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि वावळोली कोविड केअर सेंटरला सोमवारी (दि. 19) आमदार रविशेठ पाटील यांनी भेट दिली. या दोन्ही ठिकाणी योग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी या वेळी दिले.
आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी सुधागड तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. तब्बल एक कोटी रुपयांच्या आमदार निधीचा वापर कोविड संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सुधागड तालुक्यातील जनतेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली.
सुधागड तालुक्यातील जनतेला कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येईल. येथील रुग्णांना पेण येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येतील. वावळोली कोविड केअर सेंटर व पाली आणि जांभुळपाडा आरोग्य केंद्रांना आवश्यक साधनसामग्री पुरविली जाईल असे या वेळी आमदार पाटील म्हणाले.
काही दिवसांपुर्वी झालेल्या अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसलेल्या तोरणपाडा, भैरव आदी गावांना जलद नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सुधागड तालुकाध्यक्ष चंद्रकांत घोसाळकर, तालुका सरचिटणीस सागर मोरे, जि.प. सदस्य रवींद्र देशमुख, तहसीलदार दिलीप रायण्णावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, डॉ. नंदकुमार मुळे, सरपंच रोहन दगडे, भाऊराव कोकरे, अरविंद फणसे, विजय देशमुख, प्रमोद पावगी, वासुदेव मराठे, वासुदेव कानडे व राजेंद्र गांधी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
हॅलो आमदार हेल्पलाईन
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर, रुग्णवाहिका सेवा हवी असल्यास, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्यास, रेमसेडिवीर इंजेक्शन मिळत नसल्यास, गृहविलविकरण असलेल्या व्यक्तीस मदतीची गरज हवी असल्यास, कोणती वैद्यकीय मदत मिळत नसल्यास हॅलो आमदार हेल्पलाईन (7798095757) वर कॉल करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.