Breaking News

पोलादपूर : आदिवासी जीवन अनास्थेच्या गर्तेत

पोलादपूर तालुक्यातील आदिवासी जमातीची जीवन पध्दत अद्याप अविकसित आणि असंघटीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील दूर्गम भागात सरकारी डॉक्टर पोहोचत नसताना काही बोगस डॉक्टर्स मात्र तेथे पोहोचून रूग्णसेवेसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. परिणामी, वैद्यकीय सेवेवरील विश्वासार्हतेपेक्षा त्यांची अनुपलब्धताच आदिवासी समाजातील वैदूंना उपचारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ग्रामीण व आदिवासी भागात नालगूद, कावीण, धूपनी, धावरा, मोड, दमा, हातपाय सुजणे, कावीळ, अंगावरून जाणे, पोटदूखी, फोड येणे, हगवण, ताप, खोकला, सर्दी, वात, मुडदूस, जुलाब, लहान मुलांना डबा होणे, उलटी, खरूज अशा विविध आजारांवर उपचारांसाठी डॉक्टरांनी आदिवासी रूग्ण न घेतल्याने नाणेघोळ, कापडे, कोंढवी, गांजवणे, हावरे,पैठण, पोलादपूर, लोहारमाळ, सडवली, पार्ले, देवपूर आणि आड येथील वैदू आदिवासी रूग्णांवर उपचार करीत असल्याचे एका सामाजिक संस्थेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे. तर अनेक डॉक्टर्स मात्र आदिवासी रूग्णांना परस्पर वाटेला लावतात, असा विरोधाभास तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्रामअभियान हे पोलादपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण आहे. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत मुलांचे पोषण व आरोग्य स्थितीत सुधारणा करणे आणि बालमृत्यू रोखण्यासाठी या अभियानांतर्गत लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, पूरक पोषण आहार, महिलांचे आरोग्य व पोषण तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण अशा सेवांसोबत जनजागृतीचे आदिवासींमध्येही प्रयत्न होण्याची गरज आहे.

संवर्धित वनांसाठी अनास्था

पोलादपूर तालुक्यातील जंगल आणि इकोसेन्सेटिव्ह प्रदेशामध्ये वनौषधींची उपज निसर्गत:च आहे. आदिवासींना या वनौषधींचा वापर आणि पारख पूर्वापार आहे. आदिवासी केवळ जंगलातून पावसाळ्यात आळंब्या आणतात आणि उन्हाळ्यात ओले काजू, आंबे आणि फणस घाऊक व्यापार्‍यापर्यंत पोहोचवून उदरनिर्वाह करतात, हा अलिकडील व्यापारी समज, या समाजाला त्या पूर्वापार व परंपरागत वनौषधी ज्ञानापासून दूर करण्यास कारणीभूत ठरला आहे. सोबतच तालुक्यातील वनजमिनीवरील वनौषधींचा र्‍हास करणारी मातीचोरी व डोंगर सपाटीकरणाची यंत्रे वैदूंच्या सेवेवर अनिष्ट परिणाम करीत आहेत. परिणामी, वनवासींसाठी संवर्धित वनांची संकल्पना वनविभागाने पुढाकार घेऊन अस्तित्वात आणण्याची गरज आहे.

तालुक्यातील रेडेखाचर, दत्तवाडी, तुर्भेखोंडा, हावरे, वाकण, ढवळे, बोरघर, किनेश्वर, कुडपण, परसुले, काटेतळी, सडवली आदी भागांतील जंगलामध्ये मुबलक प्रमाणात असंख्य जंगली वनौषधींचा साठा आढळून येत आहे. काही वर्षांपूर्वी या वनौषधीची आदिवासींकडून मोठ्या प्रमाणात फुटकळ व्यापार्‍यांना विक्री होत असे. मात्र, त्याकामी मिळणारा मोबदला फारच अत्यल्प असल्याने आदिवासींनी ही विक्री बंद केली. आता स्थानिक वैदूंना जंगलामध्ये फिरूनही या वनौषधींचा शोध घेताना त्या दूर्मिळ झाल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम, एकेकाळी तालुक्यातील वैदूंची प्रभावी ठरलेली आरोग्य उपचारपध्दती वनौषधीअभावी निष्प्रभ ठरू लागली असून रूग्णांना गुण न आल्याने डॉक्टरांकडे जाणे अपरिहार्य ठरत आहे.

’अ‍ॅक्शन प्लॅन’ अपूर्णच

श्रमजीवी जनता सहाय्यक मंडळाच्या पोलादपूर शाखेने स्थापन केलेल्या आदिवासी आधार संघटनेने तालुक्यामधील विविध आदिवासी वाड्या आणि आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी ’अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला होता. त्यात तालुक्यातील साखर, पार्ले, भोगाव, कोंढवी, लोहारमाळ, पैठण, देवपूर, आड, सवाद, तुर्भे, नाणेघोळ, खडपी, गांजवणे, पोलादपूर, सडवली, माटवण, रानबाजिरे, कापडे, हावरे या 19 आदिवासी वाड्यांमध्ये 381 कुटूंबे असून रस्ता, पाणी, गावठाण, घरकुल, शाळागृह, अंगणवाडी, आरोग्य सुविधा, रोजगार, स्वयंरोजगार तसेच विविध उन्नतीविषयक विकास कामांचा अभाव असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून विविध गावांतील प्रतिनिधींनी आपआपल्या गावातील आदिवासीवाडीमधील समस्या गटविकास अधिकारी आणि सभापतींकडे मांडल्या होत्या.

आदिवासी कामगारजीवन असंघटीत

खरिपाचा हंगाम संपल्यानंतर नदीपात्रालगतच्या शेतांमध्ये वीटभट्टी आणि रेतीउपसा हे व्यवसाय आदिवासी कुटूंबांच्या मेहनतीवर महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये दरवर्षी सुरू होतात. पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर, सवाद, माटवण, कालवली, दिवील, कापडे, पितळवाडी तर महाड तालुक्यातील वीर, चिंभावे, दासगांव, सव, रावढळ, गोठे तसेच बिरवाडी भागात मोठया प्रमाणात वीटभट्टया सुरू झाल्या आहेत. या सर्व वीटभट्टयांवर असंघटीत कामगार क्षेत्रातील मोठी श्रमशक्ती म्हणून आदिवासी कुटूंबांचे स्थलांतर करून उपयोगात आणली जात आहे. नद्यांतील वाळू उपसाकामीदेखील अशीच आदिवासी जोडपी मेहनत करताना दिसतात. याखेरिज आंबा बागायतदारांकडे आदिवासी कुटूंबांना उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करावे लागते. पावसाळ्यात लावणी आणि कापणीच्या वेळी या असंघटीत कामगारांचा उपयोग केला जातो. मात्र खरिप हंगाम संपताच या कुटूंबियांना उपजिविकेसाठी अन्यत्र जावे लागत असल्याने त्यांच्या मुला-मुलींना शाळा व शिक्षणापासून वंचित राहावे लागते. वस्तीशाळांमध्ये मुलांना ठेऊन जाण्यास आदिवासी जोडपी फारशी तयार नसतात. मात्र पावसाळ्यानंतर होणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीकडे शिक्षण विभागाचे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षणापासून वंचित राहणारी आदिवासी मुले ही शालेय पोषण आहारालाही मुकतात आणि कुपोषणग्रस्त होत असल्याचे दिसून येते. या समाजाला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक गळती, अंधश्रध्दा, अन्य समाजांच्या गुलामीची मानसिकता, आरोग्याचे प्रश्न आणि कुपोषण आदी महत्वाच्या समस्यांपैकी आदिवासींची पुढची पिढी शिक्षणाचा अभाव आणि कुपोषणाने अंध:कारमय होण्याची शक्यता अधिक झाली आहे.

दारूचे दुष्परिणाम, बालविवाह, अंधश्रध्दा यामुळे समाजाचे आणि आदिवासी कुटूंबाचे विशेषत: महिलांचे होणारे नुकसान याबाबत समाजप्रबोधन करणार्‍या यंत्रणा पोलादपूर तालुक्यात अस्तित्वातच नाहीत. अशा अनेक कारणांमुळे पोलादपूर तालुक्यातील आदिवासी समाज अविकासित आणि असंघटित राहात आहे.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply