साई सहारा प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण
पेण : प्रतिनिधी
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेणमध्ये लवकरात लवकर 200 खाटांचे हॉस्पिटल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सोमवारी (दि. 19) येथे दिली.
साई सहारा प्रतिष्ठानच्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 16 वर्षांपासून अपघातग्रस्तांना विनामूल्य मदत करणार्या कल्पेश ठाकूर यांच्या निस्वार्थी समाजसेवेचा आदर्श जिल्ह्यातील तरुणांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी या वेळी केले.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे तसेच लसीकरणही करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. कोरोना नियमांचे पालन करून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील तरणखोपकर यांनी केले.
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा (ता. पेण) येथील हॉटेल साई सहारा येथे झालेल्या या कार्यक्रमास पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार डॉ. अरुणा जाधव, वरिष्ठ माजी पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, पेण पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गोविंद पाटील, उपनिरीक्षक के. आर. भौड, डॉ. किशोर देशमुख, महावितरणचे अभियंता संजय ठाकूर, प्रतिष्ठानचे कल्पेश ठाकूर आदी उपस्थित होते.